July, 2016

MI मराठी - आपलं अधिवेशन

एखादं अधिवेशन जेव्हा एकदम मस्त होतं, सुरळीत होतं, सोयीस्कर होतं... तेव्हा ती एक खूणगाठ असते; त्या मागे झटणाऱ्या असंख्य हातांची, मराठी माणसांमधल्या एकीची, आपापसातल्या ऋणानुबंधाची!

अधिवेशनाचं आयोजन करणं हे दोन वर्षांसाठी एखादी कंपनी चालवण्याइतकं आव्हानात्मक असतं, किंवा कदाचित त्याहूनही अधिक! ह्याचं कारण म्हणजे, इथे 'कर्मचारी' नसतात, तर 'स्वयंसेवक' असतात. स्वयंसेवक (volunteer) म्हणजे कसल्याही आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न ठेवता, एखाद्या सत्कार्यासाठी अंत:प्रेरणेने झटणारी व्यक्ती. 'आपण काम का करतो?' हा इतका मूलभूत प्रश्न असूनही एक नाही, दोन नाही, दहा नाही, वीस नाही, तर तब्बल तीनशेहून अधिक स्वयंसेवकांची फौज अधिवेशनाच्या कार्यासाठी उभं करणं, हे सोपं काम नक्कीच नाही.

आम्हा डेट्रॉइटकरांना इथल्या मराठी मंडळाचा, मराठी समुदायाचा खूप अभिमान आहे. आम्हांला कुणी विचारलं की तुमच्यातला सगळ्यात महत्त्वाचा असा फक्त एक गुण सांगा, तर त्याचं उत्तर असेल 'आमच्यातली एकी'. एकमेकांना धरून वाटचाल केली तरच आपण मोठं काहीतरी करू शकतो, सगळे मिळून यशस्वी होऊ शकतो, असा आम्हांला विश्वास वाटतो. अधिवेशनाचे काम सुरू करण्यापूर्वी आम्ही सगळ्यांना एक प्रश्न स्वत:लाच विचारायला सांगितला होता. 'मी स्वयंसेवक का होऊ इच्छितो?' प्रत्येकाला स्वतःकडून स्वतःपुरतं जेव्हा ह्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळतं, तेव्हाच तो मनापासून स्वयंसेवक होतो! ह्या प्रश्नाला एक ठराविक उत्तर नाही. कुणाला मराठी भाषेची सेवा करायची असते, कुणाला परदेशात आपली मराठी संस्कृती जपायची असते, कुणाला नवे मित्र-मंडळी जोडायचे असतात, कुणाला आपलं कौशल्य वाढवायचं असतं, तर कुणाला पुढच्या पिढीला मराठी भाषेचा गोडवा चाखायला द्यायचा असतो. आपलं उत्तर काहीही असो, ते आपल्यापुरतं समाधानकारक असलं की झालं!

ग्रँड रॅपिड्सला आपली अधिवेशनाची जागा निश्चित झाल्यावर, आम्ही सर्व स्वयंसेवकांची तिथे एक सहल आयोजित केली होती. तेव्हा १४० स्वयंसेवक उपस्थित होते. आपल्या आगामी अधिवेशनाची जागा पाहून आम्हा सर्वांचाच उत्साह द्विगुणित झाला. 'मी स्वयंसेवक का होऊ इच्छितो?' ह्याचं बऱ्याच जणांना, 'एक उत्कृष्ट अधिवेशन करण्यासाठी' असं एक नवं उत्तर मिळालं!

अधिवेशनासाठी स्वयंसेवक होणं हे एखाद्या सोशल नेटवर्किंग वेबसाईटसारखंच असतं. जितके जास्त युजर्स, तितकी ती वेबसाईट समृद्ध! किंवा टेस्ला मोटर्सचं उदाहरण घ्या. जितकी जास्त लोकं इलेक्ट्रिक गाड्या घेतील, तितकी जास्त चार्जिंग स्टेशन्स उभारता येतील, ज्याचा सगळ्यांनाच फायदा होईल. त्याचप्रमाणे अधिवेशनासाठी जितके जास्त स्वयंसेवक मिळतील, तितकं काम वाटलं जाईल. सगळ्यांनाच आनंद मिळेल आणि आपलं अधिवेशन अधिक यशस्वी होईल. तुम्हांला आपल्या ह्या अधिवेशनासाठी स्वयंसेवक व्हायचं असेल, तर संपर्कासाठी ईपत्ता: arajesh.oak@bmm2017.org किंवा anjali.anturkar@bmm2017.org. आपल्या स्वयंसेवक समितीला राजेश ओक ह्याचं सक्षम नेतृत्व लाभलं आहे. आपण डेट्रॉइटपासून लांब राहत असाल, किंवा कुठल्या कारणामुळे तुम्हांला स्वयंसेवक होणं शक्य नसेल, तर तुम्ही दूत (ambassador)होऊ शकता. तुमचा ईमेलपत्ता आम्हांला पाठवल्यास आम्ही अधिवेशनाविषयीची माहिती वेळोवेळी आपणांस देत जाऊ. आणि अँबेसिडर ह्या नात्याने तुम्ही फक्त ती आपल्या मित्रमंडळींना देत राहावं, एवढीच अपेक्षा!

आपला मदतीचा प्रत्येक हात हा समुद्राच्या लाटेसारखा असेल. ती लाट कदाचित कुणाला दिसणार नाही, पण आपल्या सगळ्यांच्या लाटांनी तयार होणाऱ्या विशाल समुद्राचं यथार्थ दर्शन ७-९ जुलै २०१७ रोजी सगळ्यांना होईल!

- सुशांत खोपकर (डेट्रॉइट, मिशिगन)