Sep 2016

नमस्कार मंडळी,

श्री. गजाननाच्या आगमनासाठी आतुर आणि सिद्ध झालेल्या सर्व मराठी बांधवांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. हा सुखकर्ता-दुखहर्ता गणराज जसा आपल्यावर वरदहस्त ठेऊन असावा अशी आपली प्रार्थना असते त्याचप्रमाणे त्याने आपल्या सर्व बांधवांवर कृपादृष्टी ठेवावी अशीही आपण प्रार्थना करूया.

आपल्यापैकी अनेक मंडळांच्या आणि व्यक्तींच्या सहकार्याने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशन या संस्थेच्या मदतीकरिता गेल्या वर्षी केलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (बृ. म. मं.) आवाहनाला आपण उत्तम प्रतिसाद दिला. त्याबद्दल आम्ही आपले अत्यंत ऋणी आहोत. बदलत्या काळाची गरज ओळखून सोशल मीडियाच्या या जमान्यामध्ये बृ. म. मंडळाच्या व्याप्तीचा आणि लौकिकाचा आपल्या महाराष्ट्रासाठी अधिकाधिक उपयोग व्हावा, याकरिता आम्ही आणखी एक पाऊल पुढे टाकत आहोत.... कदाचित ह्यायोगे अमेरिकेतील मराठीजनांना खऱ्या अर्थाने थोडे का होईना आपल्या मातृभूमीचे ऋण फेडल्याचे समाधान मिळेल. बृ. म. मंडळाने ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’ आणि बे एरियातील ‘रंगमंच संस्था’ यांच्या सहकार्याने संपूर्ण अमेरिकावासियांना एकत्र आणणारा एक आगळा वेगळा प्रकल्प 'सेतू बांधा रे...’ हाती घेतला आहे. या अंतर्गत आपण सगळे एकत्र येऊन बांधणार आहोत एक माणुसकीचा सेतू. ह्या 'सेतू' प्रकल्पातून जमा होणारा निधी महाराष्ट्रातील तळागाळात जाऊन नि:स्वार्थीपणे काम करणाऱ्या संस्थाना पोहोचवण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत दिलेली देणगी ही अमेरिकेतील तुमच्या आयकरातून मुक्त असेल. आवश्यक निधी गोळा झाल्यास अनेक प्रकल्प राबवण्यासाठी आपण आर्थिक मदत करू शकतो. केवळ निधीसंकलन नाही तर प्रश्नांच्या मुळाशी जाऊन ते सोडविण्याकरिता आपले ज्ञान, कर्तृत्व आणि मेहनत या बळावर आपापल्या क्षेत्रात उच्च पदावर पोहोचलेल्या इथल्या मराठी मंडळींनी जर आपला थोडा वेळ देऊ केला, थोडे मार्गदर्शन देऊ केले, तर तीही मोठी मदत ठरेल. मग ती मदत एखादा शेतीविषयक वैज्ञानिक सल्ला असू शकतो, पाणी-नियोजना-विषयी मार्गदर्शन अथवा एखादा तंत्रज्ञान विषयक सल्ला. याच विचाराने निधी संकलनाबरोबरच अनेक मान्यवरांनादेखील या साखळीने जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. सामाजिक जाणीवेने भारले जाऊन आपण सर्वजण एकत्र येउन हा उपक्रम राबवीत आहोत. तुमच्या सक्रीय सहभागाची आम्हाला अपेक्षा आहे.

या अनोख्या आणि समाजाभिमुख उपक्रमाचे Goodwill Ambassadors म्हणून ज्यांचा जनमानसावर प्रभाव आहे, ज्यांना आपल्या कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याची, बांधिलकीची जाणीव आहे आणि स्वत:तील सकारात्मक ऊर्जेला आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याची शक्तीही आहे, असे लोकप्रिय कलाकार असतील. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा आमच्या याही आवाहनाला साथ देऊन अनेक व्यक्ती या कार्यासाठी पुढे सरसावतील अशी अपेक्षा आहे. हा प्रकल्प यशस्वी करण्याकरिता अनेकांच्या मदतीची गरज आहे. आपण सर्वजण मिळून हा प्रकल्प नक्कीच यशस्वी करू शकतो.

मंडळी जाता जाता एका उल्लेखनीय आणि अभिनंदनीय घटनेचा आवर्जून उल्लेख करायचा आहे. कॅलिफोर्नियातील सिमी व्हॅली इथल्या मराठी शाळा चालक/पालकांनी आणि इतर मराठी बांधवांनी तिथल्या स्थानिक वाचनालयात मराठी पुस्तकांचे दालन सुरू करण्यात यश मिळविले आहे. ऑगस्ट २०,२०१६ रोजी ह्या दालनाचं मोठ्या दिमाखात उद्घाटन झालं त्याविषयी सविस्तर माहिती आपण या अंकात वाचालच. सिमी व्हॅलीमधील ह्या मराठी वाचनालयाला आमच्या हार्दिक शुभेच्छा.

गणपती बाप्पा मोरया!

- नितीन जोशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)