Aug 2016

अमेरिकेच्या मातीत आपलं 'मराठीपण' साजरं करायला आपण जरी दर दोन वर्षांनी अधिवेशनासाठी एकत्र येत असलो, तरी प्रत्येक अधिवेशन हे दुसऱ्या अधिवेशनापेक्षा वेगळं असतं, किंवा ते वेगळं असावं असा प्रयत्न तरी आपण केला पाहिजे. मग जर सगळ्या अधिवेशनांचं स्वरूप, ओपनिंग सेरेमनी, क्लोसिंग सेरेमनी, अध्यक्षांचं भाषण, प्राईम टाईम कार्यक्रम, रुचकर जेवण, विक्रेते, मित्रांच्या गाठी-भेटी, सांस्कृतिक कार्यक्रम.. हे सगळं जर तसंच राहत असेल, तर त्यात वेगळेपण ते काय? आणि कसं? आम्हांला असं वाटतं, की प्रत्येक अधिवेशनाला एक सूत्र आणि संवादी सूर (theme) असतो. हेच अधिवेशनाला काही वेगळेपण प्राप्त करून द्यायची संधी देत असतं. आपल्या ह्या १८ व्या अधिवेशनाची दोन सूत्रं आहेत - 'Enhance belonging to the Marathi community' आणि 'Bring Marathi to the forefront'. मग ही सूत्रं वापरून आपण ह्या अधिवेशाला कसं घडवत आहोत? त्याला वेगळा आकार कसा देत आहोत?

सोशल मीडियाला आणि विशेषकरून फेसबुकला सध्याच्या जगात फारच महत्व आहे. आपल्या अधिवेशनाची सूत्रं अवलंबण्यासाठी आपण फेसबुकचा वापर करून काही प्रकल्प सुरू केले आहेत. 'प्रकाशझोतात' हा आपला पहिला प्रकल्प. आपल्या प्रत्येकामधे एक 'स्टार' असतो. अमेरिकेत शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त येऊन इथे स्थिरस्थावर होणे, हीच एक कौतुकास्पद गोष्ट आहे. पण आपल्यातली काही माणसं ही त्यांच्या क्षेत्रात जरा जास्तच यशस्वी झाली आहेत, किंवा त्यांनी त्यांच्या प्रवासात एक वेगळीच वाट धरली आहे. आपल्यात मुकुंद मराठेंसारखा कुणी नाटकवेडा आहे, ज्यांनी 'कला' ही संस्था सुरू करून नाटकासाठी स्वतःला वाहून घेतलं आहे, तर विलास ठुसे यांच्यासारखा पौरोहित्य सांगणारा अभियंता आहे. अभिजित घोलपसारखा स्वतःची कंपनी यशस्वीरित्या सुरू करून नंतर 'देऊळ' सारख्या सुंदर सिनेमाची निर्मिती करणारा IITian आहे, अडीचशेच्यावर शोध निबंध, पंचावन्नच्यावर पेटंट्‌स असणारे डॉ. मकरंद गोरे आहेत आणि उभ्या उभ्या विनोद सांगून अमेरिकेतल्या प्रेक्षकांना कित्येक वर्षं पोट धरून हसायला लावणाऱ्या शुभदा कामेरकर आहेत. ह्यांना आणि ह्यांच्यासारख्या तुमच्या आमच्यातल्या कित्येक रत्नांना आपण जगासमोर, 'प्रकाशझोतात' आणत आहोत.

आपला दुसरा प्रकल्प म्हणजे 'मी प्रवासी'. विमानाचा शोध लागल्यानंतर अक्षरश: पाखरांसारखी माणसं प्रवास करू लागली! अमेरिकेत येणारी मराठी माणसं म्हणजे फक्त पुण्या-मुंबईतून निघून न्यूयॉर्क किंवा कॅलिफोर्नियात आलेली माणसं नव्हेत. कुणी चेन्नईमधून महाराष्ट्रात आले आणि तिथून अमेरिकेला. कुणी शिकागोमधून साताऱ्याला गेले आणि आता मिशिगनमधे आहेत. कुणी लंडनमधून महाराष्ट्रात, तिथून अमेरिकेला! थोडक्यात काय, तर ज्यांच्या पावलांना निदान एकदा मराठी मातीचा स्पर्श झालाय, आणि एकदा अमेरिकेच्या मातीचा स्पर्श झालाय, ते सगळे ‘आपले प्रवासी'! मुलुखावेगळा 'प्रवास' केलेल्या ह्या मराठी माणसांशी आपण गप्पा मारतो, त्यांचे अनुभव जगासमोर मांडायचा प्रयत्न करतो आणि त्यातून जन्म घेते 'मी प्रवासी' ही व्हिडीओ सिरीज!

जगात कुठे कुठे आहेत आपले मराठी बांधव? आपली संस्कृती, कला, साहित्य आणि भाषेवरचं प्रेम जपण्यासाठी विविध देशात, विविध शहरांत ते काय प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतील? आपण जर उद्या कामानिमित्त दुसऱ्या देशात, अनोळखी शहरात गेलो तर मराठी भाषेचा आपलेपणा, पुरणपोळीचा गोडवा किंवा ढोल-ताशा-तुतारीचा निनाद आपल्याला कुठे मिळू शकेल? - 'आपली मराठी, आपले विश्व' हे सदर BMM 2017 ची टीम आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहे. जगातल्या विविध मराठी मंडळांची ओळख करून देत आहे. मराठी बांधवांना एकमेकांच्या जवळ आणत आहे. आपल्या भाषेला योग्य तो मान मिळवून द्यायचा प्रयत्न करत आहे.

तसेच आपण 'आठवणींचा कट्टा' हा उपक्रम अधिवेशनात करणार आहोत. एका वाक्यात सांगायचे झाले तर विविध शाळा, कॉलेज आणि गावांचे ते गेट-टुगेदर असणार आहे. मराठी माणसांमधला ऋणानुबंध वाढवण्यासाठी आपला तो खारीचा वाटा असेल! 'पेटवा मशाल' हा असाच एक उपक्रम लवकरच आपल्यासमोर येणार आहे. त्यायोगे उत्तर अमेरिकेतल्या मराठी मंडळांना जोडण्याचा तो आपला प्रयत्न असेल. हया सर्व प्रकल्पांची माहिती अधिवेशनाच्या फेसबुकपानावर (BMM2017) आणि bmm2017.org ह्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे, चला तर मग, पुढच्या महिन्यात पुन्हा भेटू, अधिवेशनाची अधिक माहिती घेऊन!

- सुशांत खोपकर (डेट्रॉइट, मिशिगन)