Sept 2016

'दिवस छानसे, सोनेरीसे,

तिन्ही सांजेच्या, निरांजनासे..'

वयाची पन्नाशी ओलांडली की सूर्य डोईवरून जरा पश्चिमेकडे कलल्याची जाणीव होऊ लागते. हळूहळू पश्चिम क्षितिजावरचे केशरी, पिवळा, लाल, गुलाबी, जांभळा.. रंग दिसू लागतात. ते आपल्याला खुणावू लागतात. एखाद्या शांत क्षणी आयुष्याचा हिशोब मांडावासा वाटतो. पाप-पुण्याची, सुख-दु:खाची गणिते मांडावीशी वाटतात, आणि कधीतरी अचानक सोनेरी संधिप्रकाश पडतो! आपल्याला जाणीव होते, की कदाचित हाच तो आयुष्याचा टप्पा आहे, ज्याची आपण कधीपासून आतुरतेने वाट पाहत होतो. आता मुलं मोठी झालेली असतात. आपण बऱ्याच जबाबदारीतून मुक्त झालेलो असतो. 'अगदी मनासारखं जगायची हीच का ती वेळ?' असा प्रश्न पडतो, मनगट आपोआप घट्ट होतं, आणि अंगात अजून शिल्लक असलेली धमक आपल्याला नव्याने दर्शन देते. पण मग मधेच एकटेपणा डोकं वर काढतो. आपल्याला चिडवतो. तेव्हा असं वाटतं, की आपल्यासारख्याच समवयस्क मित्रमैत्रिणींना घेऊन धमाल करावी, त्यांच्याशी गुजगोष्टी कराव्यात, सुख-दु:ख वाटून घ्यावीत, एकमेकांकडून शिकावं, आणि आपण सगळ्यांनी मिळून त्या एकटेपणाची चांगली जिरवावी! पण कुठे मिळतील अशी मित्रमंडळी? या वयात? आणि या देशात? उत्तर अमेरिकेतल्या आणि जगभरातल्या सगळ्याच, आयुष्याच्या उत्तरार्धात प्रवास करणाऱ्या आपल्या वडील बंधुभगिनींना हे सगळं करायला एक मंच मिळावा, म्हणून 'उत्तररंग' नावाची परिषद आपण बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१७ मध्ये आयोजित करत आहोत, बृ. म. मंडळाचं हे अठरावं अधिवेशन. ज्यांनी बृ. म. मंडळ अधिवेशनाला सुरुवात केली, त्याला एवढं मोठं केले, त्यासाठी अपार कष्ट केले ते सगळे आज ह्या, म्हणजे ५०+ वयोगटात आहेत. ह्याच लोकांनी मराठी कलेचा, संस्कृतीचा वृक्ष अमेरिकेच्या मातीत लावला, वाढवला. त्याचीच गोड फळं आज आपण चाखत आहोत. टीव्ही मालिका, सिनेमा, नाटकांचे दौरे आज कितीही वाढले असले तरी बृहन्महाराष्ट्र मंडळावर, त्याच्या अधिवेशनांवर मनापासून प्रेम करणारी ही माणसं. त्यांच्यासाठी हा 'उत्तररंग' मंच आपण उपलब्ध करून देणे, हे एका अर्थाने आपले कर्तव्यच नाही का!

अमेरिकेतल्या काही शहरांत जेष्ठ बंधुभगिनींचे संघ (क्लब्स) आहेत आणि त्याला उत्तम प्रतिसादही मिळतो आहे. पण ज्यांच्या शहरात असे संघ नाहीत, त्यांना ते सुरू करायला प्रोत्साहन मिळावं, त्याची माहिती मिळावी यासाठी 'उत्तररंग' परिषद उपयोगी ठरेल. शिवाय एकमेकांच्या संघांची, त्यांच्यातल्या उपक्रमांची माहिती मिळेल. ‘Finding meaningful life in senior years’ म्हणजेच 'आयुष्याच्या उत्तरार्धात नव्या दिशांचा शोध' ही आपल्या 'उत्तररंग'ची संकल्पना आहे. त्यासाठी अनेक माहितीपूर्ण चर्चासत्रे, गटचर्चा, परिसंवाद, अपंग व्यक्तिंची देखभाल करण्यासाठी प्रशिक्षण, विविध स्थानिक मदत संस्थांबद्दल चर्चा... अशा सगळ्या गोष्टींचं आपण आयोजन करणार आहोत. ह्या पलीकडे हसायला, गप्पा मारायला, थट्टा-विनोद करायला, एकमेकांना अनुभवांचं गाठोडं आणि आठवणींची शिदोरी उघडून दाखवायला 'उत्तररंग'चा मंच असेल!

‘उत्तररंग’ फक्त जेष्ठ माणसांसाठी असेल, असं मुळीच नाही. तरुणांनीही ह्यात जरूर सहभागी व्हावे. ह्या दोन पिढीतला संवाद वाढवण्यासाठी, एकमेकांची बाजू समजून घेण्यासाठी, कुटुंबाच्या भिंती अजून मजबूत करण्यासाठी उत्तररंगाचा उपयोग होईल. पूर्वीसारखी एकत्र कुटुंब पद्धत आता इथे अस्तित्वात नाही. त्यामुळे ज्या गोष्टींना आपल्याला मुकावं लागतं, त्यावर काही उपाय असू शकतील का? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न जर दोन्ही पिढ्यांनी केला तर ते कदाचित लवकर सापडू शकेल..

लॉस एंजलीस येथे २०१५ मधे झालेल्या बृ. म. मंडळ अधिवेशनात 'उत्तररंगला' भरघोस प्रतिसाद मिळाला होता. अधिवेशनाची नोंदणी सुरु झाल्यांनतर काहीच कालावधीत उत्तररंग परिषद 'sold out' झाली होती! ह्यावेळी जास्तीत जास्त लोकांना सहभागी होता यावे म्हणून उत्तररंगासाठी आपण मोठे हॉल्स राखून ठेवणार आहोत. पण ह्या परिषदेला मिळणारा प्रतिसाद बघता नोंदणी सुरू झाल्यावर लवकरात लवकर आपली नावनोंदणी करणे, हेच उत्तम! उत्साह हा संसर्गजन्य असतो. १८व्या अधिवेशनाच्या सोहोळ्यात आपण ज्या उत्साहाने सहभागी व्हाल, त्याच्या दुप्पट उत्साह आणि आनंद तिथून परतताना आपल्याजवळ असेल..!

गणपती बाप्पा आता लवकरच सगळ्यांना भेटायला येत आहेत. गणेशोत्सवाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा!

- सुशांत खोपकर (डेट्रॉइट, मिशिगन)