Nov 2016

नमस्कार मंडळी,

तुम्हा सर्वांना दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. धन, संतती, आरोग्य आणि मन:शांती ह्यापैकी ज्याची उणीव असेल ते किंवा हे सर्वच आपल्याला लाभो हीच सदिच्छा!

इथे दिवाळी साजरी करतांना प्रत्येकाला आपल्या भारतातल्या घराची, गावाची आणि आप्तेष्टांची आठवण नक्कीच येते. फटाके, आकाशकंदील, किल्ला, रांगोळी, फराळ, ओवाळणी हे सगळे शब्द एकदम फेर धरून मनात नाचायला लागतात. ह्या आठवणींची साठवण हीच आपली संस्कृती. दिवाळीच्या निमित्ताने त्या सर्व आठवणींचे सुखदायी स्मरण मनाला एक वेगळीच उभारी देऊन जाते. यंदा प्रथमच अमेरिकेच्या टपाल खात्याने दिवाळी प्रित्यर्थ खास पोस्टाचे तिकिट प्रकाशित केले आहे. ह्याचा सर्व भारतीयांबरोबर आपल्यालाही आनंद झाला असेलच. न्यु यॉर्क महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष संग्राम भोसले ह्यांनी तर मंडळातर्फे मोठ्या प्रमाणावर ती तिकिटे खरेदी करून दिवाळी प्रित्यर्थ सर्व सभासदांना वाटण्याचा संकल्प केला आहे, ह्याचं विशेष कौतुक करावं असं वाटतं!

आपण दिवाळी साजरी करतोय, पण अमेरिकेच्या राजकारणात मात्र “शिमगा” चाललाय! आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी झडताहेत. सगळे राजकारणी इथून-तिथून सारखेच हे त्यांच्या वादविवादाच्या सभांमधून पुन्हा पुन्हा स्पष्ट होतंय. १९ ऑक्टोबरच्या सभेत दोन्ही उमेदवारांच्या अर्थकारणात देशाची आर्थिक अधोगती होणार असं भाकीत अर्थतज्ञांनी केल्याचं समजलं. म्हणजे थोडक्यात आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय, ह्याची चिंता परमेश्वरानेच करावी, अशी आपली परिस्थती आहे. असो! ह्या विषयावर लिहिण्याची ही जागा नाही आणि अधिकाराने तसे काही लिहावे अशी माझी योग्यताही नाही, तेव्हां, “जे जे होईल ते ते पाहावे.”

दोन महिन्यांपूर्वी मी आपल्याला “सेतू बांधा रे” ह्या आपल्या नवीन प्रकल्पाविषयी माहिती दिली होती. बृहन्महाराष्ट्र मंडळ (बृ. म. मं.), ‘रंगमंच’ आणि ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ ह्यांच्या साहचर्याने सुरू झालेल्या, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या उन्नतीकरिता असलेल्या ह्या निधी-संकलन- प्रकल्पासाठी श्री. राहुल देशपांडे आणि श्री. महेश काळे ह्या प्रतिथयश कलाकारांनी सदिच्छा प्रवक्ते (Goodwill Ambassadors) म्हणून मदत करण्याचे मान्य केले आहे. लवकरच त्यांच्या कार्यक्रमांद्वारे अथवा इतर प्रसार-माध्यमांतून ते या प्रकल्पाला सहाय्य करण्याचे आवाहन करतील. वेगळ्या दिशेने आम्ही उचललेलं हे पाऊल आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने यशस्वी होईल ही खात्री आहे. १९ नोव्हेंबर रोजी न्यु जर्सी येथे महाराष्ट्र फाउंडेशनचा “निधी संकलन” सोहळा संपन्न होईल. ज्यांना शक्य असेल त्यांनी तिथे आवर्जून उपस्थित राहावे अशी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष विनंती केली आहे.

२०१७चं अधिवेशन आता आठ महिन्यांवर येऊन ठेपलंय. दिवाळीच्या सुमुहुर्तावर २९ ऑक्टोबर पासून सवलतीच्या दरात नावनोंदणी सुरू होणार आहे. अर्थात हे सवलतीचे दर अल्पकाळासाठी आहेत. त्यासंबंधी सविस्तर माहिती या अंकात आपण वाचालच. अधिवेशनाला येण्याचं आपल्याला आत्तापासूनच आमंत्रण देऊन ठेवतो!

पुन्हा एकदा सर्वांना “शुभ दीपावली”!

- नितीन जोशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)