Dec 2016

नमस्कार मंडळी,

२०१६ च्या ह्या शेवटच्या अंकात लिहिण्यापूर्वी वर्षभरातल्या घटनांचा आढावा घ्यायला बसलो पण पहिल्या दहा महिन्यांपेक्षा नोव्हेंबरच सनसनाटी बातम्यांनी भरला होता हे प्रकर्षानी जाणवलं. अमेरिका आणि भारत ह्या दोन्ही देशांच्या इतिहासात ‘न भूतो न भविष्यती’ अश्या ह्या घटना होत्या. एकीकडे लोकशाहीचं अभूतपूर्व आणि बरचसं अनाकलनीय प्रदर्शन तर दुसरीकडे स्वराज्याचं सुराज्य करण्याच्या उद्देशानी उचललेलं प्रगतीशील पण धाडसी पाऊल! आणि अशा प्रसंगी आपण आशावादी राहायचं की भविष्याच्या चिंतेने खचून जायचं ह्या संभ्रमात पडलेला मध्यमवर्ग! विविध प्रसार माध्यमांतून पसरवल्या गेलेल्या खऱ्या-खोट्या बातम्यांमुळे उभी राहिलेली अनेक प्रश्नचिन्ह आपल्याला भेडसावताहेत. आज ह्या घडीला सर्व प्रसंगांना धीराने आणि संयमाने सामोरे जाणे हेच आपल्या हातात आहे. असो, कालाय तस्मै नम:

तर मंडळी, उत्साहात साजऱ्या झालेल्या दिवाळी नंतर आपण सर्वजण आता नवीन वर्षाची वाट पाहतो आहोत. आपल्यापैकी बरेचजण आपलं New Year’s Resolution काय असावं ह्याचाही विचार करत असतील. गेली पस्तीस वर्षे अखंडपणे सुरु असलेला बृहन्महाराष्ट्र मंडळाचा हा “वृत्त” प्रकल्प मात्र आजही उत्तर अमेरिकेतल्या मराठी लोकसंख्येचा विचार करता फारच थोड्या लोकांना परिचित आहे. गेली अनेक वर्षे वृत्ताच्या संपादिका म्हणून सौ. विनता कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी-सल्लागार श्री. मोहन रानडे आणि श्री. वैभव पुराणिक अतिशय आत्मीयतेने वृत्ताचा प्रत्येक मासिक अंक वेळेवर प्रकाशित करतात. आपल्या सदस्य मंडळांच्या अध्यक्षांना माझी नम्र विनंती आहे की आपण प्रत्येक अंक आवर्जून आपल्या सर्व सभासदांना इ-मेल द्वारे पाठवावा. ललित साहित्य, इतर मंडळांमधल्या घडामोडी, बृ.म.मं. चे उपक्रम आणि २०१७ च्या अधिवेशानाविषयीची उपयुक्त माहिती वृत्तात असते. उत्तर अमेरिकेतल्या प्रत्येक मराठी नागरिकापर्यंत हे वृत्त पोहोचणे आवश्यक आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस माझी भारत भेट झाली त्या वेळी लोकसत्ता आणि सकाळ ह्या मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांशी प्रत्यक्ष संवाद साधता आला. आपल्या मंडळाच्या कार्याची सविस्तर माहिती जाणून घ्यायला ते अतिशय उत्सुक होते. त्या विषयी पुढच्या महिन्यात सविस्तर लिहीनच. “मराठी तितुका मेळवावा” हे आपलं बोधवाक्य सार्थ करण्याचा आमच्या कार्यकारिणीचा कायमच प्रयत्न असतो. आपल्या सर्वांचा सहभाग, सहकार्य आणि शुभेच्छा कायम आमच्या सोबत असू द्या हीच विनंती.

तुम्हा सर्वांना २०१७ च्या अधिवेशनाला येण्याचं आग्रहाचं आमंत्रण आहेच. अधिवेशनाची नावनोंदणी दिवाळीच्या सुमूहर्तावर सुरु झाली आणि केवळ पंधरा दिवसांत १७०० हून अधिक लोकांनी सुरुवातीच्या सवलतीच्या दराचा फायदा घेऊन नावनोंदणी केली आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. सवलतीच्या दराचा दुसरा टप्पा ह्या वर्षाच्या अखेरी पर्यंत उपलब्ध आहे तरी ह्या संधीचा जरूर फायदा घ्या आणि त्वरित नावनोंदणी करा. आपली सर्वांची आम्ही आणि अधिवेशनाचे संयोजक-स्वयंसेवक आतुरतेने प्रतीक्षा करीत आहोत.

बराय तर मंडळी, आता भेटूया नविन वर्षात! Happy Holiday Season to all of you!

नितीन जोशी

अध्यक्ष, बृ.म.मं.