Jan 2017

नमस्कार मंडळी,

सर्वप्रथम वृत्त्ताच्या सगळ्या वाचकांना आणि समस्त मराठी समाजाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! नोव्हेंबर अखेरीस भारतभेटीहून परतलो. नेहमीप्रमाणे, तिथून येतांना आपल्या सर्वांच्या तोंडून निघणारं “ह्या वेळीसुद्धा फारच धावपळ झाली” हे वाक्य घोकतच परतलो! पण त्यातल्यात्यात अधिवेशनासंबंधी काही लोकांशी चर्चा आणि मुख्य म्हणजे पुण्यात दैनिक सकाळ आणि लोकसत्ता कार्यालयांना भेट देता आली. सुदैवाने मंडळाच्या सचिव सौ. सोना भिडे आणि माजी अध्यक्ष व विश्वस्त श्री. गिरीश ठकार त्याच वेळी पुण्यात असल्याने त्यांचाही सहभाग ह्या पत्रकार मुलाखतीत लाभला. दैनिक सकाळमध्ये आमची संक्षिप्त मुलाखत प्रसिद्ध केल्याबद्दल संपादक श्री. मल्हार अरणकल्ले, सहसंपादक श्री. सुनील माळी आणि प्रमुख वार्ताहर श्री. संभाजी पाटील ह्यांचे मन:पूर्वक आभार. त्यांनी अतिशय उत्सुकतेने आपल्या इथल्या आयुष्याविषयी आणि मुख्यत: बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (बृ. म. मं.) कार्याविषयी आस्थेने विचारणा केली. लोकसत्ता कार्यालयातदेखील संपादक श्री. मुकुंद संगोराम यांच्याशी बऱ्याच गप्पा झाल्या.

पुण्यानंतर आमचा मुक्काम दोन दिवस नाशिक येथे होता. महाराष्ट्रात मी अनेक गावांमध्ये राहिलो आहे तरी माझं गाव म्हटल्यावर नाशिकच आठवतं. मी सुमारे ४० वर्षांनंतर नाशिकला पुन्हा जात होतो. माझे पेठे विद्यालयातले अनेक मित्र आता “What’s App” मुळे पुन्हा एकत्र आले आहेत. त्या सर्वांना भेटण्याची अनिवार इच्छा पूर्ण झाली. बालपणीची मैत्री हे एक वेगळंच नातं आहे हे सर्वच मान्य करतील पण ते मनाच्या तळाशी किती खोलवर आणि घट्ट रुजलेलं असतं ह्याची प्रचिती आली आणि मी अक्षरशः मोहरून गेलो. माझा मित्र मिलिंद दातार मला घेऊन गावभर फिरला आणि जुन्या नाशिक मधल्या प्रत्येक ठिकाणी जिथे मी लहानपणी खेळलो, बागडलो ती प्रत्येक जागा मी पुन्हा एकदा डोळेभरून पाहिली. गंगेचा (गोदावरी) परिसर पाहून मात्र खूप वाईट वाटलं. आमच्यावेळी वैभवशाली वाटणारा तो परिसर आज भग्नावषेशाच्या जवळपास पोहोचला आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे. आपल्या पैकी ज्यांना आपल्या ‘गावाला’

जाणं शक्य नसेल त्यांना माझी विनंती आहे, की आपल्या गावासाठी काहीतरी करा. मी ह्या वेळी

नाशिकमधील आधाराश्रम’ (http://www.adharashram.org/) ह्या संस्थेला

भेट दिली.
अनाथ मुलामुलींसाठी अतिशय उत्तम कार्य करणारी ही संस्था सेवाभावी व्यक्तींच्या आणि देणगीदारांच्या सहकार्याने आज अनेक निराधारांचा आधार ठरली आहे. मी ह्या संस्थेला दरवर्षी आर्थिक मदत करण्याचा संकल्प केला आहे. मला कल्पना आहे, की तुमच्यापैकी अनेकांनी अशा प्रकारचं कार्य आपल्या गावासाठी किंवा संस्थांसाठी केलं आहे. आपल्यावर संस्कार करणाऱ्या अनेक व्यक्तींच्या व संस्थांच्या ऋणातून आपण पूर्णत: कधीच मुक्त होऊ शकत नाही पण ते फेडण्याचा मन;पूर्वक केलेला प्रयत्न आनंददायी ठरतो, असं मला वाटतं.

ह्या वर्षाअखेरीस एकदा एकटेच शांत बसा आणि आपल्या गत आयुष्याचा चित्रपट पहा. उर्दू शायर जनाब वसीम बरेलवी म्हणतात त्याचा प्रत्यय तुम्हाला निश्चित येईल,

किताबे माज़ी के औराक़ पलटकर देख,

न जाने कौनसा सफ़हा मुड़ा हुवा निकले|

- म्हणजे, गतस्मृतींची पाने उलटून बघ, एखादं हळव्या आठवणीचं पान दुमडून ठेवलेलं सापडेल!

पुन्हा एकदा सर्वांना “Wish you a very Happy, Healthy and Prosperous New Year”!

- नितीन जोशी

अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका