Dec 2016

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (बृ. म. मं.)

अधिवेशनाच्या नावनोंदणीला म्हणजेच रजिस्ट्रेशनला जेव्हा सुरुवात होते, तेव्हा येणाऱ्या बृ. म. मंडळाच्या अधिवेशनाचे वारे वाहू लागतात. "सेलेब्रिटी कोण येणार आहे?", "मुख्य नाटक जाहीर केलं का?", "प्रमुख पाहुणे म्हणून कोण आहेत ह्यावेळी?" याविषयी चर्चेला उधाण येतं. मित्रमंडळींना फोन करून, "ऐकलंस का, BMMचं रजिस्ट्रेशन सुरू झालंय, आपण भेटतोय तिकडे. एकच हॉटेल बुक करू." अशी भेटण्याची ग्वाही दिली जाते. विमानाची तिकिटं, हॉटेलच्या खोल्या बुक केल्या जातात, प्लँनिंगला सुरुवात होते आणि पुढच्या वर्षीच्या जुलै महिन्याची वाट बघितली जाते!

दिनांक २९ ऑक्टोबर, २०१६ रोजी, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अधिवेशनाच्या नावनोंदणीस सुरुवात करत आहोत! आनंदाची बातमी अशी, की २९ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर, ह्या छोट्याश्या कालावधीत आपण नावनोंदणीच्या शुल्कात सर्वाधिक सवलत देऊ करत आहोत! ह्या कालावधीत नोंदणी केल्यास अधिवेशनाचं शुल्क असेल: प्रौढांसाठी (वय १८+) $२६०, तरुणांसाठी (वय १२ - १८) $२१५ आणि लहान मुलांसाठी (वय ३ - १२) $१५०. तीन वर्षांखालील मुलांना मोफत प्रवेश मिळेल. अधिवेशन होईपर्यंत पुन्हा इतकी मोठी सवलत मिळायची शक्यता नसल्यामुळे ह्याच कालावधीत नावनोंदणी करणंफायदेशीर ठरेल. ह्याचा फायदा जसा उपस्थितांना होणार आहे,

तसाच तो अधिवेशनाचं आतिथ्य करणाऱ्यांनादेखील होईल. जर ह्या कालावधीत सवलतीमुळे जास्तीत जास्त लोकांनी नोंदणी केली, तर उपस्थितांच्या संभाव्य आकड्याचा अंदाज बांधता येऊ शकेल, आणि त्यामुळे आम्ही आपलं स्वागत करायला अधिक सज्ज राहू शकू. म्हणून ह्या सर्वाधिक सवलतीचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा ही आपणांस विनंती. नावनोंदणी bmm2017.org ह्या संकेतस्थळावरून करता येईल. नावनोंदणीचं शुल्क हप्त्यांमधे भरण्याचीही सोय उपलब्ध आहे.

आता मुख्य प्रश्न- प्राईम टाईम चे कार्यक्रम कुठले? ह्यासाठी आपणांस अगदी थोडीशीच वाट बघावी लागेल. काही करार पूर्ण झाल्यावर थोड्याच दिवसात ते कार्यक्रम आपल्या फेसबुक पेजवरून (BMM 2017), bmm2017.org ह्या संकेतस्थळावरून आणि बृ. वृत्तामधूनही जाहीर होतील. अगदीच राहवत नसेल तर छोटीसी, अप्रत्यक्षरित्या कल्पना देतो. तीन दिगज्जांचे कार्यक्रम आपण ठेवायचा प्रयत्न करत आहोत. एक रंगभूमीचा राजा आहे, एक सिनेसृष्टीचा सम्राट आहे, आणि एक बंदिशी गाण्यातला बादशाह आहे! आणि ह्या तिघांनी गेल्या वर्षभरात मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीला मोलाचं योगदान दिलं आहे... अजून नाही अंदाज येत? थोडीशी कळ काढा!

बृ. म. मंडळाच्या अधिवेशनाचं व्यासपीठ म्हणजे कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळण्याची सोनेरी संधी! आपण ह्याच उद्दिष्टाने नुकतेच दोन कार्यक्रम जाहीर केले आहेत; प्रौढांसाठी 'एकापेक्षा एक' आणि मुलांसाठी 'Kids Talent X-Travaganza’. 'एकापेक्षा एक' म्हणजे तुमची “हटके” कला मोठ्या प्रेक्षकवर्गासमोर सादर करण्याची संधी. गायन, वादन, अभिनय, नृत्य, बोलक्या बाहुल्या, जादूचे प्रयोग, कसरत, चित्रकला, सावल्यांचा खेळ... यापैकी आणि ह्या पलीकडची कुठलीही कला सादर करता येईल. ही एक स्पर्धा असून त्याअंती एक विजेता आणि दोन उपविजेते घोषित केले जाऊन त्यांना बक्षिसे दिली जातील. 'Kids Talent X-Travaganza’ म्हणजे यासारखाच पण लहानमुलांसाठी (वय वर्षे ५ - १७) असलेला कार्यक्रम. ही स्पर्धा नसेल, पण मोठ्या प्रेक्षकवर्गासमोर लहान मुलांना त्यांची कला सादर करता येईल. ह्या दोन्ही कार्यक्रमांसाठी प्रवेशिका पाठवायची शेवटची तारीख आहे ३१ जानेवारी, २०१७. अधिक माहिती: bmm2017.org

नावनोंदणी सुरू झाल्यामुळे आपल्या अधिवेशनाच्या गाडीने जणू आता पुढचा गियर टाकला आहे. त्यामुळे इथून पुढे अधिकाधिक माहिती आपल्याला वृत्तामार्फत मिळत राहील. चला तर मग, पुन्हा भेटू.

आपणां सगळ्यांना ही दिवाळी सुख-समृद्धीची आणि भरभराटीची जावो.

Happy Diwali!

- सुशांत खोपकर (डेट्रॉइट, मिशिगन)