Jan 2017

अधिवेशनाच्या तयारीचा वेग जसजसा वाढतो, तसतसा 'कुठल्या आणि किती बातम्या देऊ?’ हा प्रश्न भेडसावायला सुरुवात होते. आपण २०१७ सालात आता प्रवेश केला आहे. अधिवेशनाला केवळ सहा महिने उरले आहेत. त्यामुळे पूर्वीसारखी सविस्तर बातमी देत बसलो, तर कदाचित त्यासाठी अख्खा अंकसुद्धा पुरणार नाही! त्यामुळे ह्यावेळी आम्ही घेऊन आलो आहोत 'आजच्या ठळक बातम्या'!

सगळ्यात पहिली बातमी अशा गोष्टीची आहे, ज्याची आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती.. नॉर्थ अमेरिका कार्यक्रमांची निवड! मराठी माणसाइतका कलाप्रेमी आणि उत्साही माणूस विरळाच. नॉर्थ अमेरिका कार्यक्रमांसाठी तब्बल १५५ कार्यक्रमांचे प्रस्ताव आपल्या कार्यक्रम समितीकडे आले होते! त्यामुळे केवळ १८-२० स्लॉट्ससाठी १५५ कार्यक्रमांमधून निवड करताना कार्यक्रम समितीचा खूपच कस लागला. प्रामुख्याने, दोन उत्तम कार्यक्रमांपैकी जेव्हा फक्त एकाची निवड करणं भाग असतं, तेव्हा "उन्नीस-बीस" करणं अजूनच अवघड होऊन बसतं आणि असं ह्यावेळी बऱ्याचदा करावं लागलं! त्यामुळे प्रेक्षकांसाठी ह्यावेळी उत्तमोत्तम कार्यक्रमांची पर्वणी असेल ह्यात शंका नाही! कार्यक्रमांची निवड करताना दर्जा, विषय, कलाकारांची लोकप्रियता, बजेट आणि प्रेक्षकांची अभिरुची हे निकष डोळ्यांसमोर ठेण्यात आले होते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कार्यक्रमांसाठी ज्यांनी ज्यांनी प्रस्ताव पाठवले होते अशा सगळ्यांना त्याचे निकाल कळवण्यात येतील.

पुढची बातमी आहे भारतातून येणाऱ्या कार्यक्रमांची. काहीच दिवसांपूर्वी आपण 'गप्पा विथ नटसम्राट' आणि 'संगीत संशयकल्लोळ' ह्या कार्यक्रमांची घोषणा केली. ह्या व्यतिरिक्त इतरही उत्तमोत्तम कार्यक्रम भारतातून आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. त्यासाठी परंपरागत मनोरंजनाच्या थोडंसं पलीकडे जाऊन विविधतेने नटलेले कार्यक्रम आपण आणू शकतो का, आणि लोकांना ते आवडतील का, ह्याबद्दल सध्या विचार चालू आहे. उदाहरणच द्यायचं झालं, तर पौष्टिक अन्न/सकस आहाराबद्दल माहिती देणारा कार्यक्रम, दहशतवाद प्रतिबंधाची माहिती देणारा कार्यक्रम, अध्यात्माविषयी किंवा योगसाधनेचा कार्यक्रम आणता येईल का, ह्यावर विचार विनिमय सुरु आहे. शिवाय लहान मुलांसाठी खास कार्यक्रम आयोजित करायचे प्रयत्न चालू आहेत.

विक्रेत्यांच्या बूथची नोंदणी नुकतीच सुरू केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय.

१५ जानेवारीपर्यंत नोंदणी केल्यास शुल्कात १०% सवलत देऊ केली आहे. त्यामुळे निरनिराळी, उत्कृष्ट उत्पादने आपल्याला अधिवेशनात बघायला मिळतील, अशी आशा करूया.

ह्यापुढची बातमी नसून आपल्या मार्केटिंग टीमचं कौतुक आहे! फेसबुक आणि इतर माध्यमांतून अधिवेशनाची माहिती त्यांनी यशस्वीरित्या जगभरातल्या अनेक मराठी-जनांपर्यंत पोहोचवली. अधिवेशनाची नोंदणी सुरू झाल्यापासून थोड्याच दिवसात तब्बल २००० लोकांनी केलेली नोंदणी ही जणू त्याचीच पावती आहे! खरं म्हणजे नोंदणी शुल्कात मिळणारी $२५ सवलत ही ३१ डिसेंबर, २०१६ पर्यंत मिळणार होती. पण बरेच लोक सुट्टीसाठी सध्या भारतात गेली आहेत. त्यांच्यासाठी ही सवलत १५ जानेवारी, २०१७ पर्यंत वाढवत आहोत! आपल्या मित्र-मंडळींपर्यंत ही बातमी जरूर पोहोचवा, आणि ह्या योजनेचा लाभ घ्या.

लेखकमंडळी, आपापले पेन आणि विचारचक्रं सुरू ठेवा! बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाच्या स्मरणिकेविषयी माहिती पुढच्या महिन्यात देत आहोत. आपले विचार हजारो उपस्थितांपर्यंत पोहोचवायची ही नेहेमीच एक चांगली संधी असते.
नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा! हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच "ग्रँड" ठरो!

- सुशांत खोपकर (डेट्रॉइट, मिशिगन)