Apr, 2013

मंडळी नमस्कार,
अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनाच्या दिमाखदार सोहोळ्यात भाग घेऊन परतताना विमानातूनच हे अध्यक्षीय लिहितोयं. २४ तासांचा डेलावेअर ते सिडनीचा flying time, १५ तासांचे वेळेचे अंतर या न टाळता येणाऱ्या गोष्टी. पण दक्षिण गोलार्धातल्या एका खंडावर आपली मराठमोळी संस्कृती जपलेल्यांशी सुसंवाद साधण्यातला आनंद काही निराळाच.
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (बृ. म. मंडळ/BMM) अलिकडच्या अधिवेशनांपेक्षा खूप वेगळे, पण स्वत:चा ठसा असलेले हे ऑस्ट्रेलियन मराठी संमेलन. साहित्य-कला-संस्कृतीप्रेमी मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी आपली महाराष्ट्राशी नाळ तोडत नाही. मग ऑस्ट्रेलिया तरी त्याला कसा अपवाद असेल?
दर तीन वर्षांनी, सिडनी आणि मेलबर्न, आलटून, पालटून ही ऑस्ट्रेलियन मराठी संमेलने भरवतात. आणि मग पर्थ, ब्रिस्बेन, अ‍ॅडलेड, कॅनबेरा, अशा प्रमुख शहरांतून मराठीजन संमेलनास हजेरी लावतात. शरद पाठक यांच्या संयोजनाने साजऱ्या झालेल्या या संमेलनात मी तिथल्या मराठीजनांना बृ. म. मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच आपल्या प्रॉव्हिडन्स (ऱ्होड आयलंड) येथील आगामी अधिवेशाचे आमंत्रणही दिले. मराठी शाळा, उत्तररंग, अशा उपक्रमांविषयी बृ. म. मंडळ ऑस्ट्रेलियातील मराठी मंडळांसाठी मार्गदर्शनाचे काम करेल.
एप्रिल १७७०मधे कॅप्टन कुक हा ऑस्ट्रेलिया खंडात येऊन पोहोचला. इंग्लंडमधून नेलेल्या त्याच्या बोटीवर काही भारतीय खलाशी होते. इथल्या स्थानिक aboriginal लोकांची DNA samples पाहिली असता त्यांच्यात भारतीय अंश दिसतो. असं म्हणतात की, भारतीय उपखंडातून तिथे ४००० वर्षांपूर्वी लोकं स्थलांतरित झाली. आणि गेल्या १३० पिढ्यांनंतर ती त्यांचाच एक भाग झाली. ऑस्ट्रेलिया मधील प्रसिध्द मराठी connections/ व्यक्तिमत्व शोधतांना पुण्यात जन्मलेली लिसा स्थळेकर ऑस्ट्रेलियाच्या Womens' Cricket Team-साठी खेळते असे कळले. संमेलनाच्या दरम्यान, ऑस्ट्रेलियातला Order of Australia हा सर्वोच्च किताब मिळालेले डॉ. विजय जोशी हे देखील भेटले. लोह आणि पोलाद उत्पादनामधून निर्माण झालेले काही दुय्यम घटक रस्ते बांधकामात वापरून त्यांनी क्रांती घडवली.
त्यांनीच १५ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या आकाशवाणी सिडनीवर आपल्या बृ. म. मंडळाच्या कार्यप्रणालीविषयी आणि ऑकक बरोबर synergies build करण्याविषयी माझी खास मुलाखत घेतली.
एand down under येथून आता उत्तर गोलार्धातल्या अमेरिकेकडे वळूया. आपल्या अधिवेशनाचे सर्व कार्यक्रम आता न, झाले आहेत. आनंदाची गोष्ट अशी, की भारतातल्या कलाकारांच्या कार्यक्रमांसाठी, व्हिसा-संमतीपत्र यायला लागली आहेत. संमेलनास उपस्थित राहण्यासाठी निम्म्याहून अधिक नांवनोंदणी पूर्ण झाली आहे. तेव्हा त्वरा करा आणि निराशा टाळा.
आपल्या अधिवेशनासाठी प्रमुख पाहुण्याचे निमंत्रण विख्यात निर्माता- दिग्दर्शक- अभिनेते महेश मांजरेकर यांनी स्वीकारले आहे. मराठी रंगभूमी आणि चित्रसृष्टीसाठी सच्ची कळकळ असलेले महेश यांनी Marathi International Film and Theatre-Awards- MIFTA- पुरस्कारांची सुरुवात करून मराठी नाटकांना, चित्रपटांना, त्यातल्या तंत्रज्ञांना आणि कलाकारांना जगाच्या नकाशावर नेऊन ठेवले आहे. संमेलनाच्या प्रमुख वक्त्याचे पद डॉ. बाळ फोंडके भूषवतील. शास्त्रज्ञाची पार्श्वभूमी असल्यामुळे विज्ञानकथा लिहिण्यात डॉ. फोंडके यांचा हातखंडा आहे. एक प्रतिथयश शास्त्रज्ञ, लेखक या नात्याने ऋणानुबंध या विषयावरचे त्यांचे विचार तुम्हाला न,च आवडतील.
उत्तर अमेरिकेतील कला, विज्ञान, सामजिक कार्य अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवलेल्या व्यक्तींना आपण बृ म. मंडळ अधिवेशनात बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या पुरस्काराने सन्मानित करतो. (अधिक माहिती, पान ४ वर) प्रत्येक मंडळाकडे ह्याबद्दल मार्गदर्शक माहिती पाठवली आहे. पुरस्कार मिळणे हे तर उत्तमच, पण त्यासाठी, नामांकित होणे हेही तेव्हढेच मोलाचे आहे.
एप्रिल महिना म्हणजे आपल्या मंडळांसाठी धामधूमीचा. डेट्रॉईट (मिशिगन) मंडळाच्या अगत्याच्या निमंत्रणाने २० एप्रिलला तिथल्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात सहभागी होतोयं. यंदाच्या अधिवेशनाचे एक प्रमुख आकर्षण असलेल्या सारेगम स्पर्धेची उपान्त्य फेरी बॉस्टनमधे १३ एप्रिल रोजी आहे. त्यात अमेरिका आणि कॅनडामधून ४२स्पर्धक सहभागी असून त्यातले सहा स्पर्धक अधिवेशनामधील अंतिम स्पर्धेसाठी निवडले जातील. यशापयशाची परिमाणं त्या अंतिम सहा स्पर्धकांमधे न बघता माझ्या दृष्टीने ही commitment देऊन बॉस्टनला या उपांत्य फेरीत येणारे सर्वच स्पर्धक विजेते आहेत.
मंडळी, यंदा, महाराष्ट्रात दुष्काळाचे प्रचंड सावट आहे. यंदाच्या गुढीपाडव्याला आपल्या प्रिय महाराष्ट्राला दुष्काळरहित करण्यासाठी विविध विधायक संकल्प करून ते पूर्ण करण्याची, आणि महाराष्ट्र हे एक सुजलाम् सुफलाम् राज्य करण्याच्या प्रतिज्ञेची गुढी उभारूया!
आपला
आशिष चौघुले (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)
ईमेल achaughule@gmail.com, फोन: 302-559-1367