डिसेंबर २०१२

बृहन्महाराष्ट्र मंडळ - अध्यक्षीय: डिसेंबर २०१२

मंडळी, नमस्कार!

१ मे १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. आणि तरीही महाराष्ट्रात मराठी माणसाला मानाचे स्थान नव्हते. मुंबईतल्या नोकऱ्या, आणि आर्थिक नाड्या ह्या अमराठी लोकांकडे होत्या. मराठी जनतेची दुखरी नस अचूकपणे ओळखून आपल्या मार्मिकमधल्या व्यंगचित्रांनी ह्या सर्वाला वाचा फोडली ती बाळासाहेब ठाकरे ह्या प्रभावी व्यक्तिमत्वाने. १९६६ सालच्या शिवसेनेच्या स्थापनेनंतर गेली ४०-४५ वर्षे मराठी माणसाची अस्मिता जपणाऱ्या ह्या महान व्यक्तिमत्त्वाचा १७ नोव्हेंबर रोजी अस्त झाला. २००९ मधे त्यांना मातोश्रीवर भेटण्याची मला संधी मिळाली. राजकारण बाजूला ठेऊन, बाळासाहेबांचे नेतृत्व आणि व्यंगचित्रकारिता ह्यांचा मी सदैव आदर करतो.

१७ नोव्हेंबरलाच मी अमेरिकेतील माझ्या सर्वात आवडत्या शहराला म्हणजे सॅन डिएगोला भेट दिली. दुपारी ला
होया (La Jolla) येथे आणिसंध्याकाळी मंडळाचे अध्यक्ष मिलिंद नेमळेकर आणि कार्यकारिणीने आदरातिथ्य आणि स्थानिक गुणवत्ता यांचे सुंदर मिश्रण कसे असते ते दाखवून दिले.

१८ नोव्हेंबरला महाराष्ट्र मंडळ लॉस अँजलिसच्या दिवाळीनिमित्त कार्यक्रमाला शैलेश शेट्ये, कार्यकारिणी आणि कलाकारांनी उत्तम सहकार्याने सादर केलेल्या कार्यक्रमातून सर्वांगसंपूर्णतेची झलक दिसली.

कॅलिफोर्निया दौऱ्याआधी नोव्हेंबर महिन्याची सुरुवात टेक्सास भेटीने झाली. विदुला खाडिलकर ह्यांच्या नेतृत्वाखाली डॅलस मंडळात, जादूगार रघुवीर ह्यांच्या कार्यक्रमासाठी, शुक्रवार असूनही सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. तिथून मग २ तारखेला ऑस्टिन! तब्बल १५ वर्षांनी ऑस्टिनला भेट देत होतो. गेल्या १५ वर्षांत ऑस्टिनचा पूर्ण कायापालट झाल्याचे जाणवले. निलेश खरे आणि कार्यकारिणीने उत्तम संयोजनाने दिमाखदार कार्यक्रम आयोजित केला होता. डॅलस, ऑस्टिन इथल्या आदरातिथ्याने Every thing is big in Texas हे वाक्य तिथल्या मराठी लोकांच्या विशाल मनासाठी तंतोतंत लागू पडते.

या वर्षी मंडळांतून फेरफटका मारतांना, अध्यक्षांबरोबर सभासदांशी बोलतांना, बहुतांशी मंडळे कात टाकून सळसळत्या उत्साहाने वाटचाल करीत आहेत असेच आशादायी चित्र दिसते आहे.

याच दिवाळीच्या दिवसात, डेट्रॉईटच्या एका नर्सिंगहोममधून बृ. वृत्ताच्या एका सदस्यांचा फोन आला. त्या वृत्ताच्या नियमित वाचक आहेत. माझ्या अध्यक्षीयातून फोन नंबर घेऊन, अधिकाराने आणि आपुलकीने त्यांनी मला जे शुभाशिर्वाद दिले, ती मी यंदाच्या दिवाळीची सर्वोत्तम भेट समजतो.

दिवाळीचे निमित्त साधून २६ ऑक्टोंबर ते २५ नोव्हेंबर जादूगार रघुवीर यांच्या कार्यक्रमांचा दौरा बृहन्महाराष्ट्र मंडळाने (बृ. म. मं.) आयोजित केला होता. जादुगार रघुवीर यांच्या तीन पिढ्यांसोबत महाराष्ट्रात वाढताना त्यांचा कार्यक्रम अमेरिकेत बघण्यासाठी आणि तो nostalgic feel अनुभवण्यासाठी मंडळांचा उत्तम प्रतिसाद मिळेल असा आमचा कयास होता आणि तो तंतोतंत खरा ठरला. जादूगार रघुवीर खरं तर, भारतात त्यांच्या प्रयोगात दोन टन साहित्य वापरतात. पण अमेरिकेत केवळ दहा बॅगांमधून आणलेल्या साहित्यानिशी, गुणवत्तेत कुठेही तडजोड न करता, १२ मराठी मंडळांमधे त्यांनी कार्यक्रम केले.

प्रत्येक मंडळाने नेहमीची नाच, गाणी, नाटके, ह्यापेक्षा काहीतरी वेगळा आणि पुढच्या पिढीला आकृष्ट करणारा दर्जेदार कार्यक्रम उपलब्ध करून दिल्याबद्दल बृ. म. मंडळाला धन्यवाद दिले. बृ. म. मंडळासाठी हा आणखी एक मानाचा तुरा.

बघता बघता २०१२ साल संपत आले. माझ्या सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकीचा जमाखर्च पाहिला तर, २०१२ हे वर्ष नक्कीच तृप्ततेत गेले. कारण माझ्या यशापयशाचे ठोकताळे मी effective work life balance वर ठरवतो. दिवसा ८ ते ५ ही वेळ व्यावसायिक जीवनात घालवतांना, संध्याकाळी ५ ते सकाळी ८ ह्या वेळेत, सामाजिक बांधिलकी देखील मला तेव्हढाच आनंद देते. सापेक्षतेपेक्षा मी नेहमी निरपेक्षतेवर भर देतो. कारण निरपेक्षतेमधे अपेक्षाभंगाचे दु:ख नसते.

गेल्या वर्षभरात १४ मंडळांतील कार्यक्रमांमधे सहभागी होतांना, बृ. म. मंडळाच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती देतांना, सभासदांबरोबर समन्वय साधतांना एक अलौकिक समाधान लाभले. बॉस्टनचे २०१३चे अधिवेशन, मराठी शाळा, उत्तररंग, पॉडकास्ट, भारतातले, अमेरिकेतले कार्यक्रम, इत्यादी उपक्रमात साथ देणाऱ्या माझ्या कार्यकारिणीचे व स्वयंसेवकांचे आभार मानावे तेव्हढे थोडेच आहेत.

दिवाळी झाली, थॅन्क्स गिव्हिंग झाले, आता खाद्य संस्कृतीचा आणखी एक सरताज- ख्रिसमसचे आगमन ह्या महिन्यात आहेच. गेले महिनाभर खाण्यापिण्याची चंगळ. खाण्याच्या बाबतीत माझं म्हणजे मी जे काही खातो, ते लगेच अंगाला लागतं. त्यामुळे आश्लेषा नेहमी डाएटचा बागुलबुवा दाखवत असते. पण मी तर DIET ची व्याख्या Did I Eat That? अशीच करतो. त्यामुळे मी तुका म्हणे गप्प रहावे, जे जे दिसेल ते ते खावे असंच तत्त्व स्वीकारतो.

यंदाचा हॉलिडे सिझन व-जनाची पर्वा न करता सु-जनां बरोबर सुखाने घालवा, हीच सदिच्छा!
आशिष चौघुले (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)
ईमेल: achaughule@gmail.com फोन: 302-559-1367