March, 2013

अध्यक्षीय

मंडळी, नमस्कार!
महाराष्ट्रापासून दूर जाऊन विविध देशात विखुरलेले आपण सर्व मराठीया एका सामाईक दुव्याने जोडले जातो. मराठी साहित्य आणि भाषेच्या प्रभुत्वी योगदानाने प्रत्येक मराठी माणसाचे श्रध्दास्थान असलेल्या कुसुमाग्रज ह्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून २७ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मराठी दिवस म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्रातल्या १/२ दूरदर्शन-वाहिन्या आणि वृत्तपत्रांनी अमेरिकेतील मराठी या विषयावर माझ्या मुलाखती घेतल्या. या दिवशी प्रेरित होऊन मी आमच्या मुंबईतल्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावर, ' कुत्ता जाने, चमडा जाने' या धर्तीची त्यांच्याकडे प्रचंड उदासिनता दिसली. कदाचित मुंबईत राहून, मराठीसाठी 'अति परिचयात् अवज्ञा'ही असेल. क्षणभर वाटलं, इथे अमेरिकेत राहून आपण संस्कृती, परंपरा, भाषा जपतो हे त्या भाषेबद्दलचा ओलावा म्हणून, की आपल्या मायदेशापासून दूर राहिल्यामुळे, एक अपराधी भावना म्हणून? तुम्हीच ठरवा!
शिशिर ऋतूची जाड कात टाकून दिमाखाने वसंत ऋतूचे आगमन या महिन्यात होईल. याच वसंत ऋतूतल्या नवांकुरांप्रमाणे, मंडळांमधून होळीचे, पाडव्याचे कार्यक्रम सुरू होतील. उत्तर अमेरिकेत जरी Spring Season आला तरी त्याच वेळेस दक्षिण गोलार्धात Autumn सुरू होईल. २९ ते ३१ मार्चला Down under म्हणजेच ऑस्ट्रेलियामधे, सिडनीला, महाराष्ट्रीयन असोसिएशन ऑफ सिडनी यांच्या ऑस्ट्रेलियन संमेलनात, आग्रहाच्या निमंत्रणाने भाग घेण्यासाठी जातोय. तिथल्या स्थानिक रुढी, परंपरा या अभ्यासण्यात मला रस असेलच, पण त्याहीपेक्षा अधिक म्हणजे, ऑस्ट्रेलियामधे मराठी कशी टिकले आहे, संस्कृती- जतनाच्या, संवर्धनाच्या पध्दती काय आहेत, हेही अनुभवायचे आहे. Australian Autumn सफरीचा वृत्तांत पुढचा महिन्यात नक्की !
आपलं उत्तर अमेरिकेतलं बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन आता चार महिन्यांवर येऊन ठेपलं आहे. आधीच्या संमेलनातल्या लोकांना रुचलेल्या, तसेच न रुचलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून, बॉस्टन मंडळाच्या सहकार्याने प्रॉव्हिडन्स येथील संमेलन, ’बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ कसे करता येईल, यावर आमचा नक्कीच भर असेल.
अधिवेशनाची तयारी जोरात चालू आहे. Registration, Hospitality, Programming, Food, Expo, Marketing, CME, Business Conference अशा सर्व उपसमित्या कार्यरत आहेत. अधिवेशनातले बहुतेक सर्व कार्यक्रम न, झाले आहेत. उत्तर अमेरिकेतून ६०हून अधिक प्रस्ताव आले होते. निवड समितीच्या निकषातून तावून सुलाखून निघालेले कार्यक्रम तुम्हाला न, आवडतील. सर्व कार्यक्रमातून प्रतिबिंबीत झालेली अधिवेशनाची ऋणानुबंध ही संकल्पना तुम्हाला न,च भावेल असा मला विश्वास वाटतो.
भारतातले कार्यक्रम निवडणे आणि त्यांचा व्हिसा मान्य होऊन ते कलाकार अमेरिकेत येणे, यात एक मोठ्ठी दरी असते. हेमंत हब्बू यांच्यासारखा निष्णात वकील आम्हाला लाभल्याने सर्व कलाकारांना व्हिसा मिळावेत ही प्रार्थना.
तुम्हाला कदाचित माहीत असेल की प्रत्येक बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात, उत्तर अमेरिकेतल्या विज्ञान, कला, साहित्य, समाजसेवा अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या व्यक्तींना बृहन्महाराष्ट्र मंडळ पुरस्कारांनी सन्मानित करते. यंदा प्रथमच बृहन्महाराष्ट्र मंडळाची शाळा चालवणाऱ्या सर्वोत्तम शिक्षकालाही सन्मानित करणार आहोत. उत्तर अमेरिकेत राबवलेल्या मराठी शाळा या उपक्रमाला २७ मंडळांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्या शाळांमधले हे जे शिक्षक आहेत त्यांचा सन्मान करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. पुरस्कार जरी एकाला मिळणार असला तरी सर्वांचे कार्य अतिशय मोलाचे आहे. पुरस्कार नामांकनाबद्दल अधिक माहिती आम्ही दोन आठवड्यात मंडळांकडे पाठवू. उत्तर अमेरिकेतल्या लेखकांच्या, कवींच्या पुस्तकांचे प्रकाशनही अधिवेशनात करण्यात येईल जेणेकरुन त्यांच्या कलेची अनुभूती तुम्हा सर्वांना घेता येईल. इच्छुक लेखक, कवींनी कृपया माझ्याशी संपर्क साधावा.
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे दुसरे दोन उपक्रम BMM Directory आणि BMM Podcast यांचेही प्रकाशन अधिवेशनात होईल. अमेरिकेतल्या जेष्ठ मराठी नागरीकांच्या गरजा आणि इच्छा लक्षात घेऊन उत्तररंग या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या उपक्रमाद्वारे दोन परिषदा ऑस्टीन आणि लॉस अँजलिसमध्ये आयोजित केल्या आहेत. ऑस्टीन आणि लॉस अँजलिस मंडळांचे मदतीबद्दल मन:पूर्वक आभार.
लॉस अँजलिसवरुन आठवलं, गेल्या आठवड्यात मी ऑस्कर पुरस्कार सोहोळा बघत होतो. प्लास्टिक, सिलीकॉन आणि कृत्रिमतेने नटलेल्या त्या सोहोळ्यात एकच व्यक्ती आणि तिचे भाषण मनात घर करून गेले. ती व्यक्ती म्हणजे Best Actor या किताबाने गौरवलेला लिंकन मधला डॅनिअल डे लुईस. तो म्हणाला "My fellow nominees, my equals, my betters, I am so proud to have been included one amongst you." ते ऐकल्यावर चट्कन मनात विचार आला की विचारांची प्रगल्भता आणि लीनता यांचे उत्तम उदाहरण म्हणजे तीन वेळा सर्वोत्तम अभिनेता या किताबाने गौरवलेला हा एक खरोखरच महान नट आणि त्याहीपेक्षा महान व्यक्ती आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळासारख्या स्वयंसेवी संस्थांसाठी, माझ्यासाठी, हे नक्कीच प्रेरणादायक आहे.
आपला,
- आशिष चौघुले (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)
ईमेल: achaughule@gmail.com, फोन: ३०२-५५९-१३६७