BMM तर्फे चालवल्या जाणाऱ्या अनेक उपक्रमांपैकी ज्याचे वर्णन BMM चा "मुकुटमणी" असे करता येईल, तो म्हणजे 'BMM - मराठी शाळा उपक्रम' !

२००९ साली फिलाडेल्फिया इथे झालेल्या BMM च्या अधिवेशनामध्ये मराठी शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिक्षणक्षेत्राचा अनुभव असलेल्या श्रीमती सुनंदा टुमणे, डॉ. विजया बापट आणि श्रीमती अस्मिता जोशी ह्यांनी मिळून,भारताबाहेर राहणाऱ्या मुलांनी मराठी शिकणे किती आवश्यक आहे हे जाणून BMM अधिपत्याखाली सात ठिकाणी शाळा सुरु केल्या. शाळा म्हंटलं की त्यासाठी प्रत्येक इयत्तेनुसार निश्चित असा अभ्यासक्रम असायलाच हवा. याच भावनेतून शिक्षकांनी मिळून सखोल अभ्यासक्रम तयार केला. एप्रिल २००९ मध्ये श्रीमती लीना देवधर ह्यांच्या कार्यकाळात, पुणे येथील भारती विद्यापीठ संस्थेकडून हा अभ्यासक्रम तपासून घेतला गेला आणि त्याला अधिकृत मान्यता मिळाली. बघता बघता शाळेचा पसारा वाढत गेला. अनेक वेगवेगळ्या शहरांमध्ये मराठी शाळा सुरु झाल्या.

ऑगस्ट २०२२ मध्ये BMM मराठी अधिवेशनानंतर, श्री संदीप दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली, नव्या, ताज्या दमाच्या समितीने, सिएटल मराठी मंडळाच्या अध्यक्षा, BMM कार्यकारिणीच्या सदस्या श्रीमती सविता मोरे यांच्या नेतृत्वाचा लाभ घेत, शाळा उपक्रमाची जबाबदारी स्वीकारली. लगेचच, अनेक कामे समितीने हाती घेतली. सर्व प्रथम, गतवर्षीच्या परीक्षांची प्रमाणपत्रके प्रत्येक विद्यार्थ्याला वितरण करण्याचे महत्वाचे काम वेगाने केले गेले. तसेच विविध कामे करण्यासाठी उपसमित्या आणि स्वयंसेवक गट तयार केले गेले. शाळा-समिती मधे नॉर्थ अमेरिकेतील १४ पेक्षा अधिक राज्यातील स्वयंसेवक समाविष्ट आहेत. समितीतील कार्यकर्ते: श्री. राहुल देशमुख, श्रीमती श्रुती पांडे, श्रीमती मयूरी नाईक, श्रीमती मीनल जोशी, श्रीमती अंजली भिडे, श्रीमती पूनम शिरवळकर, श्रीमती अपर्णा तेलंग ह्या सर्वांचा BMM शाळा उपक्रमात मोलाचा वाटा आहे. प्रत्येक महिन्यात शाळा समितीने उपक्रम आयोजित केले. उदाहरणार्थ, BMM शाळा कथा पॉडकास्ट मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी.

“BMM कथा पॉडकास्ट” : गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर साने गुरुजींच्या "श्यामची आई" या पुस्तकातील अनेक अजरामर, हृदयस्पर्शी आणि अवीट गोडीच्या गोष्टींचे पॉडकास्ट सुरु झाले. पॉडकास्टवरील गोष्टी ऐकताना आपण कल्पनाशक्तीचा वापर करतो आणि त्यानुसार त्या मनावर साकारतो. त्यामुळे ह्या गोष्टी स्मरणात घट्ट बसतात. हा अमोल ठेवा पॉडकास्ट स्वरूपात खालील लिंक वर उपलब्ध आहे. http://podcasters.spotify.com/pod/show/Kathabmm

ह्या समितीवर स्वयंसेवक श्रीमती प्रगती नाडकर्णी, श्री प्रवीण पिंगळे, श्रीमती शर्मिष्ठा गाडगीळ, श्रीमती बकुळ गोडबोले, श्रीमती वसुधा ताम्हणकर, श्रीमती धनश्री सोळशे ह्या सर्वांनी मोलाचे योगदान दिले आहे.  

सर्व शाळांनी मिळून साजरे केलेले अजून दोन महत्वाचे उपक्रम म्हणजे “महाराष्ट्र दिन” आणि “शिवचरित्र पारायण” : “शिवचरित्र पारायण” हा नाविन्यपूर्ण उपक्रम शिवजयंतीच्या निमित्ताने राबवला गेला. ३१ जानेवारी ते १९ फ़ेब्रुवारी असे सतत २० दिवस 

"श्रीमान-योगी" ह्या रणजित देसाई लिखित कादंबरीतील शिवचरित्रातील निवडक प्रसंग आणि घटना यांचे अभिवाचन केले गेले.

ह्या सर्वामागचा मुख्य हेतू- अनेक देशातील आणि राज्यातील विखुरलेल्या मराठी मुलांना, त्यांच्या पालकांना आणि शाळेत आपला अमूल्य वेळ देणाऱ्या असंख्य शिक्षकांना व स्वयंसेवकांना सातत्याने एकमेकांबरोबर संपर्क साधता यावा, आणि स्थळ-काळाचे बंधन ओलांडता यावे हा आहे. प्रत्येक महिन्यात शाळा समिती विविध उपक्रम आयोजित करते. त्यामुळे अनेक देशातील मराठी मुले, त्यांचे पालक, शिक्षक आणि स्वयंसेवक एकत्र येतात. माहितीची देवाणघेवाण होते. 

नंतर २०२3 मध्ये BMM अध्यक्ष श्री संदीप दीक्षित, शाळा संचालक श्रीमती सविता मोरे आणि सर्व स्वयंसेवक यांच्या एकत्रित प्रयत्नाने, BMM आणि महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये करार झाला. ह्या कराराप्रमाणे BMM शाळेमध्ये २०२४-२५ पासून पुढे बालभारती अभ्यासक्रम शिकवला जाईल. २०२४ च्या आकडेवारीनुसार उत्तर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आणि युनायटेड किंग्डम,  या चार देशात मिळून एकूण ९५ शाळा सुरु आहेत. या शाळांमधून प्रत्येक इयत्तेनुसार पद्धतशीर शिक्षण दिले जाते. शाळा ही पूर्णपणे स्वयंसेवकांमार्फत चालवली जाते. त्याबदल्यात त्यांना कुठलाही आर्थिक मोबदला मिळत नाही. 

“मुलांनी हसत खेळत मराठी भाषा शिकावी आणि आपले संस्कार आणि संस्कृती पुढच्या पिढीने जोपासावी हाच मराठी शाळेचा हेतू आहे”.