सूचना – प्रत्येक राशिभविष्याच्या अखेरीस त्या राशीच्या जन्मनक्षत्रांसाठी त्या त्या जन्मनक्षत्राचा
तारक मंत्र दिला आहे. आपल्या जन्मनक्षत्राच्या तारक मंत्राचा उपाय म्हणून मनापासून, श्रद्धेने उपयोग केल्यास जीवनात येणाऱ्या अडचणी, अडथळे, व्याधी, पीडा, आजार व अन्य समस्या यांचे निवारण होते असा अनेकांचा अनुभव आहे. आपणही तसा प्रयत्न करून पाहावा व आपणांसही तसा अनुभव येत असल्यास आम्हांस कळवावे.

मेष
या राशीच्या प्रथम(लग्न) स्थानी मंगळ – हर्षल -राहू असे तीन ग्रह असून येथील मंगळ व हर्षल- मुळे या राशीच्या मंडळींचा स्वभाव अस्थिर, चंचल, लहरी, हट्टी, संतापी, अहंकारी असा घडला असण्याची शक्यता दिसते. त्यामुळे अकारण श्रम, दगदग कराल व उष्णताविकाराचा एखादा आजार त्रस्त करील. जपा. या राशीच्या नोकरदार मंडळींना नोकरीत प्रतिकुल परिस्थितीला तोंड द्यावे लागेलसे दिसते. येथील राहूमुळे सतत अपमान झाल्यास सूडभावना प्रज्वलित होईल. जपा. परंतु येथील हर्षल शास्त्रीय संशोधनात्मक कार्यक्षेत्र असणारांना अनुकुल व प्रगतिकारक होईल. या राशीच्या धनस्थानी वृषभ राशीत शुक्र असून तो महिन्याच्या उत्तरार्धात या राशीच्या तृतीय स्थानी मिथुन राशीत जात आहे. त्यामुळे महिन्याच्या संपूर्ण काळात तो अनुकुल होईल व त्याच्यामुळे धनलाभ होणे संभवते. तसेच त्याच्यामुळे वैवाहिक व कौटुंबिक जीवनातील सुखसमाधान लाभेल. महिन्याच्या उत्तरार्धात त्याच्यामुळे या राशीच्या काही मंडळींना भूमिलाभ होणे संभवते. तसेच काही मंडळींचा सन्मान होण्याची शक्यताही दिसते. त्यामुळे त्यांना प्रतिष्ठा प्राप्त होईल. या राशीच्या तृतीय स्थानी मिथुन राशीत प्रथमपासून रवि -बुध असे दोन ग्रह आहेतच. हे दोन्ही ग्रह महिन्याच्या उत्तरार्धात या राशीच्या चतुर्थ स्थानी कर्क राशीत जात आहेत. . त्यामुळे रवि महिन्याच्या पूर्वार्धात अनुकुल होईल व त्याच्यामुळे आरोग्य उत्तम राहील, सर्व प्रकारे सुखसमाधान लाभेल, शासकीय नोकरदार मंडळींपैकी काही मंडळींवर वरिष्ठ प्रसन्न होतील. त्यातून कोणाचा सन्मान होईल तर क्वचित कोणास एखादे उच्च पद मिळणेही संभवते. पण महिन्याच्या उत्तरार्धात तो या राशीच्या चतुर्थ स्थानी कर्क राशीत गेल्यावर प्रतिकुल होईल व त्याच्यामुळे अनारोग्य होणे, कार्यदिरंगाई होणे, आर्थिक चिंता त्रस्त करणे, कौटुंबिक सुखात बाधा येणे संभवते. या राशीच्या तृतीय स्थानी मिथुन राशीत असलेला बुधही महिन्याच्या संपूर्ण काळात प्रतिकुलच होईल व त्याच्यामुळे अकारण शत्रुत्व निर्माण होणे, हितशत्रूपासून धोका असणे, धननाश होणे संभवते. पण महिन्याच्या उत्तरार्धात त्याच्यामुळे गृहसौख्य व मित्रसुख मिळू शकेल. या राशीच्या सप्तम स्थानी तुळा राशीत केतू असून त्याच्यामुळे विविध कारणांनी मनस्थिती अस्थिर, चंचल होईल व वैवाहिक जीवनातील सुखात बाधा येणे संभवते. या राशीच्या लाभस्थानी कुंभ राशीत शनि असून तो दिनांक १२ पासून वक्री होत असून या राशीच्या दशम स्थानी मकर राशीत जात आहे. त्यामुळे महिन्याच्या पूर्वार्धात तो संततिसुखात बाधा निर्माण करण्याची शक्यता दिसते. महिन्याच्या उत्तरार्धात तो अधिक प्रतिकुल होईल व त्यामळे नोकरी-व्यवसायात मनस्तापदायक घटना घडण्याची शक्यता दिसते. जपा. या राशीच्या व्यय स्थानी मीन राशीत गुरु व नेपच्यून असे दोन ग्रह असून येथील गुरु अध्यात्म व सामाजिक कार्याची मनापासून आवड असणारांना अनुकुल होईल, पण त्याच्यामुळे कौटुंबिक सुखात बाधा निर्माण होणे संभवते. येथील नेपच्यूनमुळे मानसिक व्यग्रता, , चिंता त्रस्त करतील व नैराश्य येईल. पण तो गुप्त पोलिसखात्यात कार्यरत असणारांना अनुकुल होईल. श्रद्धा असेल तर श्रीगणेश व श्रीहनुमान उपासना अनुकुल होईल व मन:शक्ती व मन:शांती प्राप्त होईल. त्यासाठी दररोज सकाळी स्नान झाल्यावर मनापासून श्रद्धेने “श्रीगणेश अथर्वशीर्ष स्तोत्रा”चे पठण करा. रात्री झोपी जाण्यापूर्वी “हनुमानचालिसा स्तोत्रा”चे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र अश्विनी आहे त्यांनी “ ओम अश्विनीकुमाराभ्यां नमः:” तारक मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र भरणी आहे त्यांनी “ओम यमाय नमः:” तारक मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र कृत्तिका आहे त्यांनी “ओम अग्नये नमः:” तारक मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

वृषभ
या राशीच्या प्रथम(लग्न) स्थानी याच राशीत शुक्र असून तो महिन्याच्या उत्तरार्धात या राशीच्या धनस्थानी मिथुन राशीत जात आहे. त्यामुळे या महिन्याच्या संपूर्ण काळात तो अनुकुल होईल व त्याच्यामुळे कौटुंबिक व वैवाहिक जीवनातील सुखसमाधान लाभेल. शिवाय धनलाभ होणेही संभवते. या धनस्थानी प्रथमपासून रवि -बुध हे दोन ग्रह आहेतच. हे दोन्ही ग्रह महिन्याच्या उत्तरार्धात या राशीच्या तृतीय स्थानी कर्क राशीत जात आहेत . त्यामुळे हे दोन्ही ग्रह महिन्याच्या पूर्वार्धात प्रतिकुल होईल व त्यांच्यामुळे वाद, भांडणे होणे, आर्थिक समस्या त्रस्त करणे, डोळ्याचे अनारोग्य होणे संभवते. पण महिन्याच्या उत्तरार्धात रवि अनुकुल होईल व त्याच्यामुळे आरोग्य उत्तम राहील, नोकरीत वरिष्ठ तुमच्या कर्तृत्वावर प्रसन्न होतील, काही मंडळींना बढती, पगारवाढ होणे संभवते. शिवाय क्वचित कोणाचा सन्मान होणे वा कोणास एखादे उच्च पद मिळण्याची शक्यताही दिसते. पण बुध महिन्याच्या उत्तरार्धातही प्रतिकुलच होईल व त्याच्यामुळे मनस्ताप सहन करावा लागेल; पण त्याच्यामुळे धनलाभ होणेही संभवते. या राशीच्या षष्ठ स्थानी तुळा राशीत केतू असून तो अनुकुल होईल व त्याच्यामुळे आरोग्य उत्तम राहील, आचार-विचार उत्तम राहतील, सर्व ठिकाणी सहकार्य लाभेल. या राशीच्या दशम स्थानी कुंभ राशीत शनि असून तो दिनांक १२ पासून वक्री होऊन या राशीच्या भाग्यस्थानी मकर राशीत जात आहे. त्यामुळे महिन्याच्या पूर्वार्धात तो लोखंड. कोळसा यांचा व्यापार असणारांना अनुकुल होईल ;पण महिन्याच्या उत्तरार्धात तो वक्री होऊन या राशीच्या भाग्यस्थानी गेल्यावर चिकित्सक बौद्धिक कार्यक्षेत्र असणारांना अनुकुल असला तरी वक्री असल्याने सहजासहजी यशदायक होण्याची शक्यता दिसत नाही .या राशीच्या लाभस्थानी मीन राशीत गुरु व नेपच्यून असे दोन ग्रह असून येथील गुरु अनुकुल असला तरी नेपच्यून प्रतिकुल होणार असल्यामुळे आर्थिक लाभ होण्याचे बाबतीत घोटाळे, नुकसान, अर्थप्राप्तीस विलंब होणे संभवते. पण गुरुमुळे इच्छाआकांक्षा पूर्ण होतील, काही मंडळींना वाहनसुख मिळेल. विवाहेच्छूना विवाहयोग येणे संभवते. या राशीच्या विद्यार्थ्याना शैक्षणिक प्रगती करता येईल. नवे मित्र मिळणेही संभवते. या राशीच्या व्ययस्थानी मेष राशीत मंगळ, हर्षल व राहू असे तीन ग्रह असून राहूमुळे धनलाभ होण्याची शक्यता असली तरी आचरण मात्र ढोंगी होणे संभवते. येथील मंगळ -हर्षल हे दोन्ही ग्रह पूर्णपणे प्रतिकुल असल्याचाच अनुभव येईल. त्यांच्यामुळे आर्थिक समस्या त्रस्त करतील, वाद, भांडणे होतील, मानहानी होणेही संभवते. काही मंडळींना वाईट प्रसंगाला तोंड द्यावे लागेल. शत्रुत्व निर्माण होईल व अपघात होणेही संभवते. जपा. श्रद्धा असेल तर श्रीशिवशंकराची उपासना व श्रीहनुमान उपासना अनुकुल होईल आणि मन:शक्ती व मन:शांती लाभेल. त्यासाठी दररोज सकाळी स्नान झाल्यावर मनापासून श्रद्धेने “श्रीशिवलीलामृत स्तोत्रा”चे पठण करा. रात्री झोपी जाण्यापूर्वी “श्रीहनुमानचालिसा स्तोत्रा”चे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र कृत्तिका आहे त्यांनी “ओम अग्नये नमः:” तारक मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र रोहिणी आहे त्यांनी “ओम ब्रह्माय नमः:” तारक मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र मृग आहे त्यांनी “ओम सोमसोमाय नमः:” तारक मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

मिथुन
या राशीच्या व्ययस्थानी वृषभ राशीत शुक्र असून तो दिनांक १२ पासून या राशीच्या प्रथम (लग्न) स्थानी याच राशीत जात आहे. त्यामुळे संपूर्ण महिन्याच्या काळात तो सुखकारकच होईल. या राशीच्या प्रथम स्थानी याच राशीत प्रथमपासून रवि – बुध हे दोन ग्रह आहेतच. पण हे दोन्ही ग्रह दिनांक १६ पासून या राशीच्या धनस्थानी कर्क राशीत जात आहेत. त्यामुळे रवि -बुध हे दोन्ही ग्रह महिन्याच्या संपूर्ण काळात प्रतिकुल असल्याचाच अनुभव येईल. त्यांच्यामुळे अनारोग्य, आर्थिक चिंता, धननाश, दु:ख, कुसंगतीची बाधा होणे संभवते. या राशीच्या पंचम स्थानी तुळा राशीत केतू असून त्याच्यामुळे या राशीच्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळे निर्माण होणे संभवते. तसेच काही मंडळींना पोटविकाराचा आजार त्रस्त करण्याची शक्यता दिसते. या राशीच्या भाग्यस्थानी कुंभ राशीत शनि असून तो दिनांक १२ पासून वक्री होऊन या राशीच्या अष्टम स्थानी मकर राशीत जात आहे. त्यामुळे महिन्याच्या पूर्वार्धात तो काही प्रमाणात अनुकुल होईल; पण महिन्याच्या उत्तरार्धात त्याच्यामुळे अडथळे, अडचणी निर्माण होण्याची शक्यता दिसते. शिवाय त्याच्यामुळे अनारोग्य, अपघात भय असून तो दु:ख, दैन्यकारक होणे संभवते. या राशीच्या दशम स्थानी मीन राशीत गुरु व नेपच्यून असे दोन ग्रह असून येथील गुरु बौद्धिक व संशोधनात्मक कार्यक्षेत्र असणारांना अनुकुल, प्रगतिकारक व यशदायक होईल.पण येथील नेपच्यूनमुळे मनस्थिती अस्थिर होण्याची शक्यता आहे. तरीही तो मनोवैज्ञानिक व द्रव पदार्थ व्यापार असणारांना अनुकुल व लाभदायक होईल. या राशीच्या लाभस्थानी मेष राशीत मंगळ -हर्षल- राहू असे तीन ग्रह असून मंगळ -हर्षलमुळे कष्ट-परिश्रम-दगदग सहन करूनच आर्थिक लाभ होणे संभवते. त्यांच्यामुळे मैत्रीत वितुष्ट येणे, वाद, भांडणे होणे संभवते. त्यामुळे नैराश्य येणे संभवते. येथील राहूमुळे या राशीच्या अधिकारी मंडळींना वाम मार्ग धन मिळविण्याचा मोह होईल. पण त्यांनी तो मोह टाळावाच. तेच सुखाचे होईल. शिवाय या राहूमुळे संततीविषयक चिंता त्रस्त करण्याची शक्यता दिसते. श्रद्धा असेल तर दररोज सकाळी स्नान झाल्यावर मनापासून श्रद्धेने “श्रीजगदंबा दुर्गा देवी स्तोत्रा”चे पठण करा. तसेच दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र मृग आहे त्यांनी “ओम सोमसोमाय नमः:” तारक मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र आर्द्रा आहे त्यांनी “ओम नमः: शंकराय ” तारक मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र पुनर्वसू आहे त्यांनी “ओम अदितीये नमः:” तारक मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

कर्क
या राशीच्या लाभस्थानी वृषभ राशीत शुक्र असून तो दिनांक १३ पासून या राशीच्या व्ययस्थानी मिथुन राशीत जात आहे. त्यामुळे महिन्याच्या संपूर्ण काळात तो अनुकुल होईल व त्याच्यामुळे सर्व सुख, ऐषाराम मिळेल व मन:शांती लाभेल. पण या व्ययस्थानी प्रथमपासून रवि -बुध अस्से दोन ग्रह आहेतच. व हे दोन्ही ग्रह महिन्याच्या उत्तरार्धात या राशीच्या प्रथम (लग्न) स्थानी याच राशीत जात आहेत. त्यामुळे हे दोन्ही ग्रह महिन्याच्या संपूर्ण काळात प्रतिकुलच होतील व त्यांच्यामुळे अनारोग्य, शरीरपीडा, मानभंग होणे संभवते. शिवाय हाती घेतलेल्या कामात अपयश येणे, चिंता वाढणे, आर्थिक समस्या त्रस्त करण्याची शक्यता दिसते. काही मंडळींना कुसंगतीची बाधा त्रस्त करील. या राशीच्या चतुर्थ स्थानी तुळा राशीत केतू असून त्याच्यामुळे घरात कोणाशी पटणार नाही, कसली तरी चिंता अस्वस्थ करील. शिवाय तो विषभयकारक असल्याने बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका. या राशीच्या अष्टम स्थानी कुंभ राशीत शनि असून तो दिनांक १२ पासून वक्री होत असून या राशीच्या सप्तम स्थानी मकर राशीत जात आहे. त्यामुळे तो दु:ख, दैन्यकारक होईल व काही मंडळींना कसल्या तरी विचित्र आजाराची बाधा होणे संभवते. शिवाय तो अपघातकारक असल्यामुळे सतत सावधानतेने आचरण करणे अगत्याचे होईल. या राशीच्या भाग्यस्थानी मीन राशीत गुरु व नेपच्यून असे दोन ग्रह असून हे दोन्ही ग्रह अध्यात्माची मनापासून ओढ असणारांना आध्यात्मिक उपासनेस अनुकुल होतील. काही मंडळींना सूचक स्वप्ने पडतील तर काही मंडळींना दूरच्या प्रवासाचे किंवा परदेशगमनाचे योग येतील. या राशीच्या दशम स्थानी मेष राशीत मंगळ -हर्षल -राहू असे तीन ग्रह असून मंगळामुळे काही स्वतंत्र व्यवसाय असणारांच्या व्यवसायात खळबळजनक घटना घडण्याची शक्यता दिसते. या राशीच्या काही मंडळींना हातची नोकरी सोडून नवीन काही करण्याची ऊर्मि येईल. नोकरदार मंडळींना नोकरीत कामाचा ताण सहन करावा लागेल. शिवाय वरिष्ठांचा जाच होणेही संभवते. येथील हर्षल बौद्धिक व संशोधनात्मक कार्यक्षेत्र असणारांना अनुकुल व यशदायक होईल. राहूही अनुकुल व लाभदायक होईल. श्रद्धा असेल तर “श्रीगुरुदेव दत्तात्रेयाची उपासना “ मन:शक्ती व मन:शांती देऊ शकेल. म्हणून दररोज सकाळी स्नान झाल्यावर मनापासून श्रद्धेने “बावन्न श्लोकी गुरुचरित्रा”चे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र पुनर्वसू आहे त्यांनी “ओम अदितीये नमः:” तारक मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र पुष्य आहे त्यांनी “ओम बृहस्पतये नमः:” तारक मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र आश्लेषा आहे त्यांनी “ओम सर्पाय नमः:” तारक मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

सिंह
या या राशीच्या तृतीय स्थानी तुळा राशीत केतु असून त्याच्यामुळे कसले तरी मानसिक दु:ख अस्वस्थ करील. त्यासाठी उपासना केल्यास मन शांत व स्वस्थ होईल. या राशीच्या सप्तम स्थानी कुंभ राशीत शनि असून दिनांक १२ पासून वक्री होऊन या राशीच्या षष्ठ स्थानी मकर राशीत जात आहे. त्यामुळे महिन्याच्या पूर्वार्धात त्याच्यामुळे चित्तवृत्ती शांत राहील; पण या राशीच्या विवाहेच्छूना विवाहयोग संभवत नाही. पण महिन्याच्या उत्तरार्धात तो या राशीच्या षष्ठ स्थानी मकर राशीत गेल्यावर दशम या व्यवसाय स्थानास पूरक होईल. पण त्याच्यामुळे गैरसमजाने वाद, भांडणे होण्याची शक्यता दिसते. शिवाय तो अनारोग्यकारक होणेही संभवते. तसेच त्याच्यामुळे शत्रुत्व निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या राशीच्या अष्टम स्थानी मीन राशीत गुरु व नेपच्यून असे दोन ग्रह असून येथील गुरुमुळे ज्यांच्या जन्मकुंडलीत अचानक धनलाभ यो आहे अशापैकी काही मंडळींना असा अचानक धनलाभ होण्याची शक्यता दिसते. काही मंडळींना वारसा हक्काने धनलाभ होणे संभवते. पण येथील नेपच्यून जलभयकारक व विषभयकारक असल्यामुळे खोल पाण्यात पोहावयास जाऊ नका. तसेच बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका. या राशीच्या भाग्यस्थानी मेष राशीत मंगळ -हर्षल-राहू असे तीन ग्रह असून येथील मंगळ प्रवासात मनस्ताप देणारा असल्यामुळे शक्यतो प्रवास करू नका. येथील हर्षल शास्त्रीय संशोधन कार्यक्षेत्र असणारांना अनुकुल व प्रगतिकारक होईल. तसेच त्याच्यामुळे काही मंडळींना दूरच्या प्रवासाचे तर काहींना परदेशप्रवासाचे योग येतील. येथील राहू बौद्धिक दृष्ट्या अनुकुल असून तो वक्तृत्व कला अवगत असणारांना अनुकुल व लाभदायक होईल. या राशीच्या दशम स्थानी वृषभ राशीत शुक्र असला तरी सर्व प्रकारच्या कलाक्षेत्रातील मंडळीना अनुकुल होणार नाही. उलट हाती घेतलेल्या कार्यात अडचणी, अडथळे निर्माण होतील. पण महिन्याच्या उत्तरार्धात तो या राशीच्या लाभस्थानी मिथुन राशीत गेल्यावर अनुकुल होईल व त्याच्यामुळे सर्व सुख लाभेल, धनलाभही होईल व मन:शांती लाभेल. या राशीच्या लाभस्थानी मिथुन राशीत प्रथमपासून रवि -बुध हे दोन ग्रह आहेतच; पण महिन्याच्या उत्तरार्धात ते दोन्ही ग्रह या राशीच्या व्ययस्थानी कर्क राशीत जात आहेत. त्यामुळे हे दोन्ही ग्रह महिन्याच्या पूर्वार्धात अनुकुल होतील व त्यांच्यामुळे सर्वप्रकारे सुखसमाधान लाभेल. शासकीय सेवेत असणारांना बढती, पगारवाढ होणे संभवते. स्वतंत्र व्यवसाय असणारांना लाभदायक होतील. पण महिन्याच्या उत्तरार्धात ते प्रतिकुल होतील व त्यांच्यामुळे शरीरपीडा, मानहानी, अनारोग्य, होणे संभवते व हाती घेतलेल्या कार्यात अपयश येण्याची शक्यताही दिसते. जपा. श्रद्धा असेल तर भगवान विष्णूची उपासना अनुकुल होईल व मन:शक्ती व मन:शांती प्राप्त होईल. त्यासाठी दररोज सकाळी स्नान झाल्यावर मनापासून श्रद्धेने “ विष्णुसहस्रनाम स्तोत्रा”चे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र मघा आहे त्यांनी “ओम पितराय नमः:” तारक मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र पूर्वा आहे त्यांनी “ ओम भगाय नमः:” तारक मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र उत्तरा आहे त्यांनी “ ओम आर्यमे नमः:” तारक मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

कन्या
या राशीच्या धनस्थानी केतु असून त्याच्यामुळे आर्थिक चिंता त्रस्त करण्याची शक्यता दिसते. या राशीच्या षष्ठ स्थानी कुंभ राशीत शनि असून तो महिन्याच्या उत्तरार्धात वक्री होऊन या राशीच्या पंचम स्थानी मकर राशीत जात आहे. त्यामुळे महिन्याच्या पूर्वार्धात तो दशम या व्यवसाय स्थानास पूरक होईल, पण त्याच्यामुळे गैरसमजुती होऊन वाद, भांडणे झाल्यास शत्रुत्व निर्माण होणेही शक्य आहे. जपा. तसेच त्याच्यामुळे अनारोग्य होणेही संभवते. पण महिन्याच्या उत्तरार्धात वक्र गतीने तो या राशीच्या पंचम स्थानी मकर राशीत गेल्यावर बुद्धी व्यवहारी, संशयी, स्वार्थी होणे संभवते. पण हा शनि बौद्धिक कार्यक्षेत्र असणारांना चिकाटीने कार्यरत ठेवील. या राशीच्या सप्तम स्थानी मीन राशीत गुरु व नेपच्यून असे दोन ग्रह असून गुरुमुळे ज्यांचे प्रेमसंबंध आहेत ते दृढ होतील, विवाहेच्छूना विवाहयोग येईल. काही मंडळींचे नवे स्नेहसंबंध जुळून येतील. अर्थलाभ होईल व प्रवासाचे योगही येतील. पण येथील नेपच्यूनमुळे या राशीच्या विवाहित मंडळींच्या वैवाहिक जीवनातील सुखात बाधा येण्याची शक्यता दिसते. या राशीच्या अष्टम स्थानी मेष राशीत मंगळ-हर्षल-राहू असे तीन ग्रह असून हे तिन्ही ग्रह अनारोग्यकारक होतील. शिवाय मंगळामुळे हाडमोड होणेही संभवते. तसेच तो जलभयकारक व वीजभयकारक असल्यामुळे विजेची उपकरणे सावधानतेने हाताळा. खोल पाण्यात पोहावयास जाऊ नका. तसेच येथील मंगळामुळे नैराश्य येणेही संभवते. येथील हर्षल अपघातकारक असल्यामुळे सतत सावधानतेने आचरण करा. राहूमुळे या राशीच्या काही मंडळींना वाममार्ग धन मिळविण्याची तीव्र इच्छा अस्वस्थ करील. जपा. या राशीच्या भाग्य स्थानी वृषभ राशीत शुक्र असून तो महिन्याच्या उत्तरार्धात या राशीच्या दशम स्थानी मिथुन राशीत जात आहे. त्यामुळे महिन्याच्या पूर्वार्धातच तो अनुकुल होईल व त्याच्यामुळे सुखसमाधान, ऐषाराम लाभेल व काही मंडळींना गुरुकृपा व काही मंडळींना थोरकृपा प्राप्त होईल. काही मंडळींना कीर्ती-प्रसिद्धी प्राप्त होईल. पण महिन्याच्या उत्तरार्धात तो या राशीच्या दशम स्थानी गेल्यावर सर्व प्रकारच्या कलात्मक कार्यक्षेत्र असणारांना तो प्रतिकुल होईल व त्यांच्या दैनंदिन कार्यात अडथळे, अडचणी निर्माण होतील. या राशीच्या दशम स्थनी मिथुन राशीत प्रथमपासून रवि – बुध हे दोन ग्रह आहेतच. हे दोन्ही ग्रह महिन्याच्या उत्तरार्धात या राशीच्या लाभस्थानी कर्क राशीत जात आहेत. त्यामुळे महिन्याच्या संपूर्ण काळात ते अनुकुल होतील व त्यांच्यामुळे मानसिक, कौटुंबिक सुखसमाधान लाभेल. धनलाभ होईल व नवे मित्र मिळतील. शासकीय नोकरीत असणारांना बढती, पगारवाढ, मानसन्मान मिळणेही संभवते. क्वचित कोणास एखादे उच्च पद मिळण्याची शक्यताही दिसते. श्रद्धा असेल तर दररोज सकाळी स्नान झाल्यावर मनापासून श्रद्धेने “दुर्गा देवी स्तोत्रा”चे व रात्री झोपी जाण्यापूर्वी “शिवलीलामृत स्तोत्रा”चे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र उत्तरा आहे त्यांनी “ओम आर्यमे नमः:” तारक मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र हस्त आहे त्यांनी “ओम सूर्याय नमः:” तारक मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र चित्रा आहे त्यांनी “ओम त्वष्टे नमः:” तारक मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

तुळ
या राशीच्या प्रथम (लग्न) स्थानी याच राशीत केतू असून तो अनुकुल होईल व त्याच्यामुळे सर्व प्रकारे सुखसमाधान व ऐषाराम लाभेल. पण त्याच्यापासून वाहनधोका असल्यामुळे वाहने सावधानतेने व नियंत्रित वेगानेच चालवा. मोबाईलवर वार्तालाप करू नका. रस्त्याने चालताना सतत सावधानतेने चाला. या राशीच्या पंचम स्थानी कुंभ राशीत शनि असून तो महिन्याच्या उत्तरार्धात वक्री होऊन या राशीच्या चतुर्थ स्थानी मकर राशीत जात आहे. त्यामुळे महिन्याच्या पूर्वार्धात त्याच्यामुळे स्वभाव संशयी, स्वार्थी होणे संभवते. पण बौद्धिक कार्यक्षेत्र असणारांना चिकाटीने कार्य करून प्रगती करणे शक्य होईल. पण महिन्याच्या उत्तरार्धात तो वक्री होऊन या राशीच्या चतुर्थ स्थानी मकर राशीत गेल्यावर प्रतिकुल होईल व त्याच्यामुळे कौटुंबिक सुखात व गृहसौख्यात बाधा येणे संभवते. त्यामुळे नैराश्य येण्याची शक्यता दिसते. या राशीच्या षष्ठ स्थानी मीन राशीत गुरु व नेपच्यून असे दोन ग्रह असून येथील नेपच्यूनमुळे या राशीच्या काही मंडळींना उगीचच आपल्याला एखादा आजार झाल्याची भावना त्रस्त करील. काही मंडळींना काल्पनिक चिंता त्रस्त करतील. पण गुरुमुळे आरोग्य सुधारेल व सुख लाभेल. या राशीच्या सप्तम स्थानी मेष राशीत मंगळ -हर्षल-राहू असे तीन ग्रह असून येथील मंगळ -हर्षल वैवाहिक सुखाचे दृष्टीने पूर्णपणे प्रतिकुल होतील. वैवाहिक जीवनात पतिपत्नीपैकी कोणाचे तरी अनारोग्य, दोघांतील गैरसमज ,वाद, भांडणे यांमुळे वैवाहिक जीवनातील सुखात बाधा निर्माण होईल. तसेच ज्यांचा भागीदारीत व्यापार-व्यवसाय आहे त्यांनी गैरसमज, संशय अशापैकी कारणांनी भागीदारीत बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी. राहूमुळेही मनात कपटी विचार प्रबळ झाले तर वैवाहिक जीवनातील सुखात बाधा निर्माण होईल. जपा. या राशीच्या अष्टम स्थानी वृषभ राशीत शुक्र असून तो महिन्याच्या उत्तरार्धात या राशीच्या भाग्यस्थानी मिथुन राशीत जात आहे. त्यामुळे महिन्याच्या पूर्वार्धात ज्यांच्या जन्मकुंडलीत अचानक धनलाभ योग आहे अशापैकी काही मंडळींना असा अचानक धनलाभ होण्याची शक्यता दिसते. काही मंडळींना वारसा हक्काने धनलाभ होईल. काही मंडळींना कमी श्रमांत अपेक्षेपेक्षा अधिक धनलाभ होणेही संभवते. महिन्याच्या उत्तरार्धात येथील शुक्र या राशीच्या भाग्यस्थानी गेल्यावर काही मंडळींना सुसंगती लाभेल, सुख, ऐषाराम प्राप्त होईल, काही मंडळींना प्रसिद्धी प्राप्त होईल, तर काहींना गुरुकृपा, थोरकृपा प्राप्त होईल. या राशीच्या भाग्यस्थानी मिथुन राशीत प्रथमपासून रवि -बुध असे दोन ग्रह आहेतच . हे दोन्ही ग्रह महिन्याच्या उत्तरार्धात या राशीच्या दशम स्थानी कर्क राशीत जात आहेत. त्यामुळे महिन्याच्या पूर्वार्धात ते दोन्ही ग्रह प्रतिकुलच होतील व त्यांच्यामुळे मानसिक ताण, वडील मंडळींचा विरोध, भय, नैराश्य प्राप्त होईल. दैनंदिन कार्यात दिरंगाई, अडचणी, अडथळे निर्माण होतील. पण महिन्याच्या उत्तरार्धात हे दोन्ही ग्रह अनुकुल होतील व कौटुंबिक सुख लाभेल. धनलाभ होणे संभवते. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल, शासकीय नोकरदार मंडळींना बढती, पगारवाढ, प्राप्त होईल. क्वचित कोणाचा सन्मान होईल; तर एखाद्यास उच्च पदही प्राप्त होऊ शकेल. श्रद्धा असेल तर श्रीशिवशंकराची उपासना व श्रीहनुमानाची उपासना अनुकुल होईल व मन:शक्ती व मन:शांती लाभेल. त्यासाठी दररोज सकाळी स्नान झाल्यावर मनापासून श्रद्धेने “शिवलीलामृत स्तोत्रा”चे पठण करा. रात्री झोपी जाण्यापूर्वी “श्रीहनुमानचालिसा स्तोत्रा”चे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना ज्यांचे जन्मनक्षत्र चित्रा आहे त्यांनी “ओम त्वष्टे नमः:” तारक मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र स्वाती आहे त्यांनी “ओम वायवे नमः:” तारक मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र विशाखा आहे त्यांनी “ओम इंद्राग्नये नमः:” तारक मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

वृश्चिक
या राशीच्या व्ययस्थानी तुळा राशीत केतू असून त्याच्यामुळे या राशीच्या मंडळींचा स्वभाव लहरी होण्याची शक्यता दिसते. या राशीच्या चतुर्थ स्थानी कुंभ राशीत शनि असून तो दिनांक १३ पासून वक्री होऊन या राशीच्या तृतीय स्थानी मकर राशीत जात आहे. त्यामुळे महिन्याच्या पूर्वार्धात या राशीच्या मंडळींच्या कौटुंबिक सुखात व गृहसौख्यात बाधा येणे संभवते. पण महिन्याच्या उत्तरार्धात येथील शनि वक्री होऊन या राशीच्या तृतीय स्थानी गेल्यावर काही मंडळींना अपेक्षित अशी उत्तम नोकरी किंवा अपेक्षित असे उत्तम कार्यक्षेत्र मिळण्याची शक्यता दिसते. पण येथील शनि वक्री असल्याने इच्छापूर्तीत अडचणी, अडथळेही येतील. जपा. त्याशिवाय भावंडविषयक एखादी चिंता त्रस्त करण्याची शक्यता दिसते. या राशीच्या पंचम स्थानी मीन राशीत गुरु व नेपच्यून असे दोन ग्रह असून मनापासून आध्यात्मिक आवड असणारांना व गूढ संशोधनाची ओढ असणारांना संशोधन कार्यात प्रगती करणे सहज शक्य होईल. . पण मनस्थिती अति भावनाशील होणे संभवते. गुरुमुळे सर्व सुख मिळेल व अर्थलाभ होणेही संभवते. तसेच या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती करणे सहज शक्य होईल. या राशीच्या षष्ठ स्थानी मेष राशीत मंगळ -हर्षल -राहू असे तीन ग्रह असून हे तिन्ही ग्रह अनारोग्यकारकच होतील. काही मंडळींना मुदतीचा ताप येणे, उष्णता विकार बळावणे, हाडमोड होणे संभवते. या राशीच्या ज्या मंडळींचे कार्यक्षेत्र शास्त्रीय संशोधनात्मक आहे त्यांनी सतत खोल विचार करत बसू नये. नपेक्षा येथील हर्षलमुळे त्यांना डोकेदुखीचा किंवा मेंदूविकाराचा आजार होण्याची शक्यता आहे. जपा. राहूमुळे ज्यांचा परधर्मियांशी व्यावसायिक संबंध आहे अशा मंडळींना काळ अनुकुल व लाभदायक होईल. या राशीच्या सप्तम स्थानी वृषभ राशीत शुक्र असून महिन्याच्या उत्तरार्धात तो या राशीच्या अष्टम स्थानी मिथुन राशीत जात आहे. त्यामुळे तो संपूर्ण महिन्याच्या काळात अनुकुल होईल व काही विवाहेच्छूना विवाहयोग येईल. ज्यांचे प्रेमसंबंध आहेत ते दृढ होतील. कमी श्रमात अपेक्षेपेक्षा अधिक अर्थलाभ होईल. ज्यांच्या जन्मकुंडलीत अचानक धनलाभ योग आहे अशापैकी काही मंडळींना असा अचानक धनलाभ होणे संभवते. काही मंडळींना वारसा हक्काने असा धनलाभ होईल. या राशीच्या अष्टम स्थानी मिथुन राशीत प्रथमपासून रवि -बुध हे दोन ग्रह आहेतच. पण महिन्याच्या उत्तरार्धात हे दोन्ही ग्रह या राशीच्या भाग्यस्थानी कर्क राशीत जात आहेत. त्यामुळे रवि संपूर्ण महिन्याच्या काळात प्रतिकुल व मनस्तापदायकच होईल व बुध महिन्याच्या उत्तरार्धात प्रतिकुल होईल. येथील बुध महिन्याच्या पूर्वार्धात अनुकुल होईल व त्याच्यामुळे नियोजित कार्यात यश मिळेल व सुखसमाधान लाभेल. श्रद्धा असेल तर श्रीगणेश व श्रीहनुमान उपासना मन:शक्ती व मन:शांती देईल. त्यासाठी दररोज सकाळी स्नान झाल्यावर मनापासून श्रद्धेने ‘श्रीगणेश अथर्वशीर्ष स्तोत्रा”चे पठण करा. रात्री झोपी जाण्यापूर्वी “श्रीहनुमानचालिसा स्तोत्रा”चे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र विशाखा आहे त्यांनी “ओम इंद्राग्नये नमः:” तारक मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र अनुराधा आहे त्यांनी “ओम मित्राय नमः:” तारक मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र ज्येष्ठा आहे त्यांनी “ओम इंद्राय नमः:” तारक मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

धनु
या राशीच्या तृतीय स्थानी कुंभ राशीत शनि असून दिनांक १२ पासून वक्र गतीने तो या राशीच्या धनस्थानी मकर राशीत जात आहे. त्याच्यामुळे महिन्याच्या पूर्वार्धात या राशीच्या काही मंडळींना अपेक्षित अशी उत्तम नोकरी मिळण्याची शक्यता दिसते. काही मंडळींना त्यांचे आवडते कार्यक्षेत्र मिळू शकेल. पण महिन्याच्या उत्तरार्धात तो या राशीच्या धनस्थानी मकर राशीत गेल्यावर प्रतिकुल होईल व त्याच्यामुळे आर्थिक समस्या त्रस्त करण्याची शक्यता दिसते. शिवाय त्याच्यामुळे कुटुंबात अनिष्ट घटना घडण्याची शक्यता दिसते. या राशीच्या चतुर्थ स्थानी मीन राशीत गुरु व नेपच्यून असे दोन ग्रह असून नेपच्यूनमुळे घरगुती गोष्टींबद्दल गैरसमज, घोटाळे होण्याची शक्यता दिसते. पण येथील गुरुमुळे कौटुंबिक जीवनात सुखसमाधान लाभेल, काही मंडळींचे स्थावर खरेदी-विक्रीचे व्यवहार अपेक्षेनुसार पार पडतील, पण नातेसंबंधातील कोणाकडून तरी मनस्ताप दिला जाण्याची शक्यता दिसते. या राशीच्या पंचम स्थानी मेष राशीत मंगळ -हर्षल- राहू असे तीन ग्रह असून येथील राहू व मंगळामुळे संततीपैकी कोणाचे आजार, कोणाचे मनाविरुद्ध आचरण अशापैकी कारणांनी संततिसुखात बाधा येणे संभवते. काही मंडळींना स्थावरसंबंधी समस्येचा मनस्ताप सहन करावा लागेलसे दिसते. पण येथील हर्षल उच्च बौद्धिक कार्यक्षेत्र असणारांना अनुकुल व प्रगतिकारक होईल या राशीच्या षष्ठ स्थानी वृषभ राशीत शुक्र असून या राशीच्या सर्व प्रकारचे कलात्मक कार्यक्षेत्र व गुणवत्ता असणाऱ्या मंडळींना आपले कलेतील नैपुण्य प्रकट करण्यास संधीच मिळणार नाही. पण महिन्याच्या उत्तरार्धात तो या राशीच्या सप्तम स्थानी गेल्यावर प्रेमिकांचे प्रेमविवाह होणे संभवते. पण या राशीच्या सप्तम स्थानी मिथुन राशीत प्रथमपासून रवि -बुध हे दोन ग्रह आहेतच. पण हे दोन्ही ग्रह प्रतिकुल होतील व त्यांच्यामुळे अनारोग्य, दु:ख, भांडणे होण्याची शक्यता दिसते. हे रवि -बुध महिन्याच्या उत्तरार्धात या राशीच्या अष्टम स्थानी कर्क राशीत जात आहेत. त्यावेळी रवि अधिक प्रतिकुल होईल; पण बुधामुळे सुख लाभेल, कार्यसिद्धी होईल व यश मिळेल. या राशीच्या लाभस्थानी तुळा राशीत केतु असून तो अनुकुल होईल व त्याच्यामुळे सुख, धन मिळेल व प्रवास योग येणे संभवते. श्रद्धा असेल तर श्रीगुरुदेव दत्तात्रेयाची उपासना अनुकुल होईल व मन:शक्ती व मन:शांती लाभेल. त्यासाठी दररोज सकाळी स्नान झाल्यावर मनापासून श्रद्धेने “बावन्न श्लोकी गुरुचरित्रा”चे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र मूळ आहे त्यांनी ओम निऋतये नमः:” तारक मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र पूर्वाषाढा आहे त्यांनी “ओम उदकाय नमः:” तारक मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र उत्तराषाढा आहे त्यांनी “ओम विश्वेदेवाय नमः:” तारक मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

मकर
या राशीच्या धनस्थानी कुंभ राशीत शनि असून तो दिनांक १३ पासून वक्र गतीने या राशीच्या प्रथम(लग्न) स्थानी याच राशीत जात आहे. त्यामुळे महिन्याच्या संपूर्ण काळात तो प्रतिकुल होणार असून त्याच्यामुळे अनारोग्य, नियोजित कार्यात अडथळे येणे, कुटुंबातील प्रिय जणांपैकी कोणाचे स्थलांतर होणे, अनिष्ट घटना घडणे अशापैकी मनस्ताप देणाऱ्या घटना घडण्याची शक्यता आहे. या राशीच्या तृतीय स्थानी मीन राशीत गुरु व नेपच्यून असे दोन ग्रह असून येथील गुरु या राशीच्या लेखकवर्गाला अनुकुल होईल, काही मंडळींना प्रवासयोग येईल; पण एखाद्या भावंडापासून मनस्ताप दिला जाण्याची शक्यता जाणवते. नेपच्यूनमुळे मनस्थिती अत्यंत भावनाशील होणे संभवते. पण तो गूढ संशोधन कार्यास व आध्यात्मिक उपासनेस अनुकुल होईल. शिवाय त्याच्यामुळे काही मंडळींना जलप्रवासाची तर काही मंडळींना परदेशगमनाची संधी मिळेल. या राशीच्या चतुर्थ स्थानी मेष राशीत मंगळ -हर्षल-राहू असे तीन ग्रह असून येथील मंगळामुळे कुटुंबात गैरसमजाने भांडणे होणे, अन्य कटकटीचा मनस्ताप सहन करावा लागणे, कुटुंबात असमाधानकारक घटना घडणे संभवते. येथील राहू व हर्षलमुळे स्वभाव विचित्र असा होईल व त्यामुळे कशातच सुखसमाधान मिळणार नाही, कोणाशी पटणार नाही, सतत तक्रारी करत राहाल, त्यामुळे गृहसौख्यही मिळणार नाही. या राशीच्या पंचम स्थानी वृषभ राशीत शुक्र असून त्याच्यामुळे सर्व प्रकारच्या कलाकार मंडळींना आपल्या कलेत प्रगती करता येईल व सुखसमाधान लाभेल. या राशीच्या षष्ठ स्थानी मिथुन राशीत रवि -बुध असे दोन ग्रह असून महिन्याच्या उत्तरार्धात या राशीच्या पंचम स्थानी असलेला शुक्र या राशीच्या षष्ठ स्थानी मिथुन राशीत जात आहे. त्यामुळे रवि -बुध दशम या व्यवसायस्थानास पूरक होतील; कार्यसिद्धी होईल, धनलाभ होणेही शक्य दिसते. पण शुक्रामुळे या राशीच्या सर्व प्रकारच्या कलावंत मंडळींना आपले कलाकौशल्य प्रकट करण्यास संधीच मिळणार नाही. महिन्याच्या उत्तरार्धात येथील रवि -बुध या राशीच्या सप्तम स्थानी कर्क राशीत जात आहेत. त्यावेळी ते दोन्ही ग्रह प्रतिकुल होतील व त्यांच्यामुळे अनारोग्य, दु:ख, भांडणे होणे संभवते. पण येथील रवि केंद्रस्थानी असल्यामुळे भाग्योदयकारक होण्याची शक्यता आहे. या राशीच्या दशम स्थानी तुळा राशीत केतु असून त्याच्यामुळे काही मंडळींच्या नोकरीत अस्थिर परिस्थिती निर्माण होणे संभवते. काही मंडळींना हातची नोकरी सोडून नवीन काही करण्याची ऊर्मि येईल. पण त्यांनी मनावर ताबा ठेवून आहे ती नोकरीच मनापासून करावी. श्रद्धा असेल तर श्रीशिवशंकराची उपासना व श्रीहनुमानाची उपासना अनुकुल होईल व मन:शक्ती व मन:शांती लाभेल. त्यासाठी दररोज सकाळी स्नान झाल्यावर “शिवलीलामृत स्तोत्रा”चे पठण करा. रात्री झोपी जाण्यापूर्वी “श्रीहनुमानचालीसा स्तोत्रा”चे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र उत्तराषाढा आहे त्यांनी “ओम विश्वेदेवाय नमः:” तारक मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र श्रवण आहे त्यांनी “ओम विष्णवे नमः:” तारक मंत्राचाआणि ज्यांचे जन्म नक्षत्र धनिष्ठा आहे त्यांनी “ओम वसवे नमः:” तारक मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

कुंभ
या राशीच्या प्रथम (लग्न) स्थानी याच राशीत शनि असून दिनांक १३ पासून वक्र गतीने तो या राशीच्या व्ययस्थानी मकर राशीत जात आहे. त्यामुळे संपूर्ण महिन्याच्या काळात तो प्रतिकुल असल्याचाच अनुभव येईल. त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक व सावधानतेनेच करा. त्याच्यामुळे अनारोग्य, प्रिय मंडळींच्या दूरत्वामुळे येणारी अस्वस्थता, मानहानी आदि प्रतिकुल घटना घडण्याची शक्यता दिसते. जपा. या राशीच्या धनस्थानी गुरु व नेपच्यून असे दोन ग्रह असून गुरुमुळे कौटुंबिक जीवनात शुभ घटना घडतील. स्वतंत्र व्यवसाय असणारांच्या व्यवसायात प्रगती होईल. धनलाभ होणेही संभवते. पण येथील नेपच्यून प्रतिकुल होणार असून त्याच्यामुळे आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडण्याची चिंता, आर्थिक घोटाळे, आर्थिक संकटे अशापैकी घटना मनस्थिती अस्वस्थ करण्याची शक्यता दिसते. जपा. या राशीच्या तृतीय स्थानी मेष राशीत मंगळ -हर्षल- राहू असे तीन ग्रह असून येथील मंगळ शुभ असून त्याच्यामुळे धैर्य, हिम्मत, महत्त्वाकांक्षा वाढेल, हातून कर्तबगारी घडेल, पण त्याच्यामुळे दुखापत होणे संभवते. जपा. हर्षलमुळे चौकस, उच्च बौद्धिक शक्ती, स्मरणशक्ती व आकलनशक्ती प्राप्त होईल. त्याशिवाय काही मंडळींना परदेशगमनाची संधी मिळेल. राहूमुळे मन मोठे होईल, उत्साह वाढेल, हातून कर्तृत्व घडेल. पण त्याच्यामुळे बंधुसुखात बाधा येणे संभवते. या राशीच्या चतुर्थ स्थानी कर्क राशीत शुक्र असून त्याच्यामुळे ऐषाराम मिळेल, काहींना विवाहयोग येईल, ज्यांची शेतीवाडी आहे अशा मंडळींना त्यापासून लाभ होईल. हा शुक्र महिन्याच्या उत्तरार्धात या राशीच्या पंचम स्थानी मिथुन राशीत जात आहे. त्या काळात तो सर्व प्रकारच्या कलावंत मंडळींना आपल्या कलेतील प्रगती होण्यास व कलेतील आनंद मिळविण्यास अनुकुल होईल. या राशीच्या पंचम स्थानी मिथुन राशीत प्रथमपासून रवि -बुध हे दोन ग्रह आहेतच. हे दोन्ही ग्रह महिन्याच्या पूर्वार्धात प्रतिकुलच होतील व त्यांच्यामुळे अनारोग्य, अपघात, नोकरीत वरिष्ठांचा जाच, संततीपैकी कोणाचे आजारपण अशापैकी घटना घडण्याची शक्यता दिसते. महिन्याच्या उत्तरार्धात येथील रवि -बुध या राशीच्या षष्ठ स्थानी कर्क राशीत जात आहेत. त्या काळात ते दशम या व्यवसाय स्थानास पूरक होतील, हितशत्रू पराभूत होतील, कार्यसिद्धी होईल व धनलाभ होणेही संभवते. बुधामुळे या राशीच्या काही मंडळींना कीर्ती-प्रसिद्धी मिळण्याची शक्यताही दिसते. या राशीच्या भाग्यस्थानी तुळा राशीत केतू असून त्याच्यामुळे “वरून कीर्तन, आतून तमाशा” असे धूर्त, ढोंगी आचरण होणे संभवते. त्याशिवाय त्याच्यामुळे संततिसुखात बाधा येण्याची शक्यताही आहे. श्रद्धा असेल तर “श्रीशिवशंकराची उपासना” व “श्रीहनुमान उपासना “ अनुकुल होईल व मन:शक्ती व मन:शांती लाभेल. त्यासाठी दररोज सकाळी स्नान झाल्यावर मनापासून श्रद्धेने “शिवलीलामृत स्तोत्रा”चे पठण करा. रात्री झोपी जाण्यापूर्वी “श्रीहनुमानचालिसा स्तोत्रा”चे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र धनिष्ठा आहे त्यांनी “ओम वसवे नमः:” तारक मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र शततारका आहे त्यांनी “ओम वरुणाय नमः:” तारक मंत्राचा, आणि ज्यांचे जन्मनक्षत्र पूर्वाभाद्रपदा आहे त्यांनी “ओम अजैकचरणाय नमः:” तारक मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

मीन
या राशीच्या प्रथम (लग्न) स्थानी याच राशीत गुरु व नेपच्यून असे दोन ग्रह असून नेपच्यूनमुळे मनस्थिती अति कोमल व भावनाशील होईल व त्यामुळे मनाविरुद्ध थोडे काहीही घडले तर लगेच गहिरे नैराश्य येईल. पण गुरुमुळे आरोग्य उत्तम राहील व बौद्धिक कार्यक्षेत्र असणारांना तो अनुकुल, प्रगतिकारक व यशदायक होईल. या राशीच्या धनस्थानी मेष राशीत मंगळ -हर्षल-राहू असे तीन ग्रह असून हे तिन्ही ग्रह महिन्याच्या संपूर्ण काळात प्रतिकुल असल्याचाच अनुभव येईल. मंगळ व राहूमुळे अनारोग्य, आर्थिक चिंता, कौटुंबिक जीवनात गैरसमज, वाद, भांडणे होण्याची शक्यता आहे. हर्षलमुळे मनस्थिती अति अस्थिर, चंचल होईल व हातून सतत अविचाराचे आचरण घडण्याची शक्यता दिसते. शिवाय आपल्या फटकळ बोलण्याने समोरच्याचा अपमान होत आहे याचे भानही राहणार नाही. जपा. या राशीच्या तृतीय स्थानी वृषभ राशीत शुक्र असून तो दिनांक १३ पासून या राशीच्या चतुर्थ स्थानी मिथुन राशीत जात आहे. त्यामुळे महिन्याच्या संपूर्ण काळात तो अनुकुल होईल व त्याच्यामुळे या राशीच्या काही मंडळींना भूमिलाभ, काही मंडळींना धनलाभ तर काही मंडळींना मान, प्रतिष्ठा प्राप्त होण्याची शक्यता आहे. या राशीच्या चतुर्थ स्थानी मिथुन राशीत प्रथमपासून रवि -बुध असे दोन ग्रह आहेतच. पण हे दोन्ही ग्रह महिन्याच्या उत्तरार्धात या राशीच्या पंचम स्थानी कर्क राशीत जात आहेत. अशा परिस्थितीत रवि पूर्णपणे प्रतिकुल होईल व त्याच्यामुळे आर्थिक चिंता, कौटुंबिक त्रास, अनारोग्य, अपघात, कार्य दिरंगाई, नोकरीत वरिष्ठांचा जाच, कुटुंबातील प्रिय जनांचा दुरावा, संततिविषयक चिंता अशापैकी घटना घडण्याची शक्यता दिसते.. बुधामुळे महिन्यांच्या पूर्वार्धात गृहसौख्य व मित्रसुख मिळेल; पण धननाश होण्याची शक्यताही दिसते. महिन्याच्या उत्तरार्धात त्याच्यामुळे संतति समस्या त्रस्त करण्याची शक्यता आहे. या राशीच्या अष्टम स्थानी तुळा राशीत केतू असून त्याच्यामुळे कौटुंबिक व वैवाहिक जीवनातील सुखात बाधा येणे संभवते. त्याशिवाय तो अनारोग्यकारक व अपघातकारक होणेही संभवते. जपा. या राशीच्या व्ययस्थानी कुंभ राशीत शनि असून तो महिन्याच्या उत्तरार्धात वक्र गतीने या राशीच्या लाभस्थानी मकर राशीत जात आहे. त्यामुळे महिन्याच्या संपूर्ण काळात तो प्रतिकुल व मनस्तापदायकच होईल. त्या काळात आर्थिक व्यवहार सावधानतेने काळजीपूर्वक करा. नपेक्षा नसते लचांड मागे लागेल. जपा. शिवाय संततिविषयक समस्याही चिंता निर्माण करीतसे दिसते. श्रद्धा असेल तर श्रीगुरुदेव दत्तात्रेयाची उपासना अनुकुल होईल व मन:शक्ती व मन:शांती प्राप्त होईल. त्यासाठी दररोज सकाळी स्नान झाल्यावर मनापासून श्रद्धेने “बावन्न श्लोकी गुरुचरित्रा”चे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र पूर्वाभाद्रपदा आहे त्यांनी “ओम अजैकचरणाय नमः:” तारक मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र उत्तरा भाद्रपदा आहे त्यांनी “ओम अहिर्बुध्न्याय नमः:” तारक मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र रेवती आहे त्यांनी “ओम पूषाय नमः:” तारक मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
Old Archives – Rashibhavishya
-
2022
-
2021
-
2020
-
2019
-
2018
-
2017
-
2016
-
2015
-
2014
-
2013
-
2012
-
2011