दीपस्तंभ फाउंडेशन ही दिव्यांग, अनाथ, आदिवासी व वंचित विद्यार्थ्यांसाठी निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उच्च शिक्षण व तंत्रज्ञान प्रशिक्षण देणारी भारतातील पहिली संस्था आहे.
जळगाव व पुणे येथील प्रकल्पांच्या माध्यमातून भारतातील १८ राज्यातील ५०० विद्यार्थ्यांची निवासी शिक्षण प्रशिक्षणाची जबाबदारी घेतली जाते.
या विद्यार्थ्यांसाठी संस्थेने पायाभूत सुधारणा, तंत्रज्ञान, आणि मनुष्यबळाचा प्रभावी वापर केलाआहे.
या माध्यमातून अनेक विद्यार्थी IAS/IRS ऑफिसर, बँक ऑफिसर, इंजिनियर, डॉक्टर, वकील, व उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत.
संस्थेचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन हे अठरा वर्षांपासून पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते व शिक्षण तज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
या कार्यासाठी संस्थेला महाम्हीम राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वश्रेष्ठ सामाजिक संस्था राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच यजुर्वेंद्र यांच्या सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांना “लोकमत – महाराष्ट्रीयन ऑफ द इयर” या प्रतिष्ठित पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या समाजरंग कार्यक्रमांतर्गत यजुर्वेंद्र महाजन यांचा अमेरिका दौरा आम्ही आखला आहे.
या दौऱ्यात यजुर्वेंद्र, अमेरिकेतील १४-१५ शहरांना भेटी घेऊन तेथील मराठी मंडळातील लोकांशी संवाद साधून त्यांच्या ‘दीपस्तंभ’ या दिव्यांग मुलांची पूर्ण जबाबदारी घेऊन त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी काम करणाऱ्या संस्थेबद्दल माहिती देणार आहेत.
बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून आपण नेहमीच चित्रपट किंवा नाटकातील कलाकारांचे दौरे करतो , मात्र एखाद्या समाजसेवकाचा इतका मोठा अमेरिका दौरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
जर तुमच्या मंडळामध्ये हा कार्यक्रम झाला, तर नक्की उपस्थित रहा आणि त्यांच्या संस्थेला सढळ हस्ताने मदत करा.
दीपस्तंभ फाउंडेशन बद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा: