Get the T-shirt and Medal design

।। जय जय राम कृष्ण हरी ।।

नमस्कार मंडळी

परदेशातील वारी पंढरीची

जून-जुलै महिन्यात होणाऱ्या या वारी योगे आपल्याला “भक्ती, व्यायाम, आणि समाजसेवा” यांचा त्रिवेणी संगम अनुभवाची संधी मिळणार आहे!!

तुम्हाला माहीतच आहे की दरवर्षी देहू व आळंदी येथून हजारो वारकरी, आषाढी एकादशीच्या निमित्ताने, पंढरपूरच्या वारीला जातात.

देहू/आळंदी ते पंढरपूर हे अंतर अंदाजे १५० मैलांचे आहे (अंदाजे २५० किलोमीटर) – हे अंतर वारकरी १९ ते २० दिवसात पूर्ण करतात.

यावर्षी आपणही वारीच्या दरम्यान जेवढे जमेल तेवढे अंतर तेवढ्याच कालावधीत (जवळजवळ तीन आठवड्यात) पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ढोबळ मानाने दररोज २, ४, ६, किंवा ८ मैल चालले तर अनुक्रमे वारीचे २५, ५०, ७५, किंवा १००% अंतर पूर्ण होईल. कुटुंबातील मंडळी एकत्रितपणे चालूनही १००% अंतर पूर्ण करू शकतात. (उदाहरणार्थ: आई, वडील आणि दोन मुलांनी दररोज २ मैल चालले तरी एकत्रितरित्या वारीचे १००% अंतर पूर्ण होईल).

माऊलीचा जप किंवा संतांचे अभंग ऐकत ऐकत चालताना किंवा धावताना ठरलेले अंतर कधी पूर्ण होते ते कळत पण नाही. मी स्वतः गेल्यावर्षी अशा प्रकारची “वारी” पूर्ण केली.

या वारीच्या निमित्ताने “समाजरंग”तर्फे आम्ही एक सामाजिक बांधिलकीचा प्रस्ताव घेऊन येत आहोत.

यानुसार सहभागी होणारे प्रत्येक मंडळ एक किंवा त्याहून अधिक सामाजिक संस्था निवडू शकते आणि आपल्या मंडळातील मंडळींना या संस्थांना सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन करू शकते.

वारीमध्ये भाग घेणाऱ्यांना ही मदत करणे बंधनकारक नाही आणि पूर्णपणे ऐच्छिक आहे

जर कुणी कमीत कमी $५० डॉलरची ऐच्छिक देणगी दिली, तर त्यांना एक टी-शर्ट तसेच विठोबा रुक्मिणीचे चित्र असलेले (३ इंचाचे) पदक मिळेल. जर जास्तीची देणगी मिळाली तर नक्कीच आवडेल.

या टी-शर्टवर बृहन्महाराष्ट्र मंडळाचा, तसेच तुमच्या मंडळाचा मानचिन्ह (लोगो) असेल. तुमच्या शहरातील प्रायोजकांना या टी-शर्टवर मागील बाजूला जाहिरात करायची संधी आहे, ज्यायोगे त्यांनी दिलेला निधी पूर्णपणे टी-शर्ट आणि पदकांच्या खर्चासाठी वापरता येईल.

५०-१००% वारीचे अंतर पूर्ण करणाऱ्यांना बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे एक प्रशस्तीपत्रक पण देण्यात येईल.

$१०० पेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांना, टी-शर्ट आणि पदक ठेवण्यासाठी एक छोटीशी खास पेटी देण्यात येईल.

नियमित व्यायाम केल्याने आरोग्याचे फायदे तर होतीलच, पण त्याचबरोबर एखाद्या सामाजिक उपक्रमाला हातभार लावल्याने मानसिक समाधान पण मिळेल.

तरी लवकरात लवकर हा उपक्रम आपल्या मंडळात जाहीर करा आणि जास्तीत जास्त लोकांना वारीमध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त करा. परत एकदा – सामाजिक संस्थांना देणगी ही ऐच्छिक आहे – बंधनकारक नाही.

सर्व मंडळे शनिवार, १४ जून रोजी वारी सुरू करू शकतात, तर वारीची समाप्ती रविवार, ६ जुलै रोजी आषाढी एकादशी होईल. एखाद्या मैदानात किंवा देवळात जमून विठू माऊलीच्या नामघोषाने तुम्ही वारीची सुरवात करू शकता.

कृपया ३० एप्रिल पर्यंत किती लोकांना टी-शर्ट आणि पदके हवी आहेत ते कळवावे तसेच निधीसंकलन ही करावे, त्यानुसार आम्हाला नियोजन करता येईल (पदके वेळेत मिळवण्यासाठी २ महिन्याचा कालावधी आवश्यक आहे).

T-Shirt Size Chart